प्रदीप पाताडे यांचे आयुष्य समुद्रानेच घडवले आहे. लहानपणी गिरगाव चौपाटीवर खेळणारा हा मुलगा पुढे मुंबईच्या सागरी जैवविविधता रक्षणाकरिता कटिबद्ध झाला. सामान्यातून असामान्यतेकडे झालेला त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. कोळय़ांच्या जाळय़ांमध्ये काय येते आहे ही उत्सुकता कोवळय़ा वयापासूनच होती. याच उत्सुकतेपोटी ते सागरी जलचरांचा अभ्यास करू लागले. १९८७ पासून ते २००९ पर्यंत ‘इंडियन एक्सप्रेस’च्या मार्केटिंग, एच. आर. आणि प्रॉडक्शन विभागात कार्यरत असलेल्या प्रदीप यांना समुद्राची गाज स्वस्थ बसून देईना. तसे ते १९९० पासून मफतलाल तरण तलावात सभासद होतेच. २००९ मध्ये नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स शिकवायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे गणेश विसर्जनात लाइफ गार्ड म्हणून काम करू लागले. प्राणीशास्त्राचे लौकिकरीत्या शिक्षण झाले नव्हते, परंतु स्वेच्छेने आणि मेहनतीने, तसेच अनेक शास्त्रज्ञांच्या संपर्कात असल्यामुळे ते लवकरच अधिकारवाणीने किनारपट्टीने आढळणाऱ्या विविध सागरी जीवांची अचूक माहिती सांगू लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचप्रमाणे बी.एन.एच.एस. या मुंबईस्थित एनजीओने त्यांना प्राणी ओळखण्याच्या बाबतीत खूप मदत केली. विशेषत: डॉ. छापगर यांनी त्यांना चांगले प्रशिक्षण दिले. आतापर्यंत त्यांनी जनजागरणासाठी मुंबईच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर ४५ हून अधिक ‘मरिन वॉक’ घेतल्या आहेत. फेसबुक आणि इन्स्टा अशा सोशल मीडियामधून देखील ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्याबरोबर अभिषेक जमालाबाद, सिद्धार्थ चक्रवर्ती, माही, शौनक, ईशा बोपर्डीकर असे अनेक तरुण प्राणीशास्त्रज्ञ एकरूपतेने काम करतात. ‘कोस्टल कंझव्र्हेशन फाऊंडेशन’ आणि ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ अशा दोन संस्थांची स्थापना आता त्यांनी जैवविविधता रक्षणार्थ केली आहे. ‘शेंदरी सी फॅन’ आणि ‘नळी मासा’ या दोन दुर्मीळ प्रजाती मुंबईच्या सागरी पाण्यात त्यांनी शोधल्या.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal ocean pradeep patade life is the sea amy
First published on: 02-06-2023 at 01:43 IST