Kutuhal of nature human history Life Magnetic substance ysh 95 | Loksatta

कुतूहल : निसर्गाचे देणे – चुंबक!

मानवी इतिहासात डोकावले तर निसर्गातून अगणित गोष्टी आपल्याला मिळाल्याचे लक्षात येईल. निसर्गाने आपले जीवन समृद्ध केले आहे.

कुतूहल : निसर्गाचे देणे – चुंबक!
कुतूहल : निसर्गाचे देणे – चुंबक!

हेमंत लागवणकर, मराठी विज्ञान परिषद

मानवी इतिहासात डोकावले तर निसर्गातून अगणित गोष्टी आपल्याला मिळाल्याचे लक्षात येईल. निसर्गाने आपले जीवन समृद्ध केले आहे. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक साधनांमध्ये, उपकरणांमध्ये चुंबक किंवा चुंबकीय पदार्थाचा वापर आपण करतो. ‘चुंबकाचा शोध’ हीसुद्धा निसर्गानेच आपल्याला दिलेली देणगी आहे.

इसवी सनापूर्वी सुमारे ८०० मध्ये म्हणजे सुमारे २८०० वर्षांपूर्वी ग्रीस देशातल्या इडा पर्वतावर एशिया मायनरमध्ये असलेल्या मॅग्नेशिया या गावात एक घटना घडली. एक मेंढपाळ आपल्या मेंढय़ा रानात चरायला घेऊन गेला होता. मेंढय़ांना हाकण्यासाठी त्याच्या हातामध्ये एक काठी होती. हातातली काठी फिरवत फिरवत मजेत चालत असताना त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली. त्याच्या काठीच्या खालच्या टोकाला लावलेल्या पत्र्याला लहान-लहान दगड चिकटले होते. त्या रानातून फिरत असताना मेंढपाळाला असे अनेक लहान-मोठे दगड सापडले. या गमतीशीर दगडांना त्या मेंढपाळाची काठी चिकटत होती. त्याच्या बुटांच्या टाचेला लोखंडी खिळे असल्याने त्यांनाही हे लहान-लहान दगड चिकटत होते.

लोखंडाला आकर्षित करणारे हे दगड मॅग्नेशिया या गावात सापडले, म्हणूनच या दगडांना ‘मॅग्नेट’ असे संबोधण्यात आले. काही संशोधकांच्या मते मात्र ज्या धनगराला हे दगड सापडले त्याचे नाव ‘मॅग्नेस’ होते आणि त्याच्या नावावरूनच या दगडांचे नाव ‘मॅग्नेट’ असे ठेवले गेले. भारतीय लोकांनासुद्धा चुंबक आणि चुंबकाचे वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म यांची माहिती प्राचीन काळापासून होती. आर्य चाणक्याने इ.स. पूर्व ३०० ते ४०० दरम्यान लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथामध्ये चुंबकाचा उल्लेख सापडतो. लोखंडी तराजूच्या एका तागडीला तळाशी वजनदार लोहचुंबक लावून व्यापारी ग्राहकांची कशी फसवणूक करू शकतात, याचे विवेचन या ग्रंथामध्ये चाणक्याने केलेले आहे.

नैसर्गिक अवस्थेमध्ये चुंबकाचे दगड खनिजरूपात असतात. या खनिजाला ‘मॅग्नेटाइट’ असे म्हणतात. अधिक संशोधन केल्यावर शास्त्रज्ञांना असे आढळले की, मॅग्नेटाइट म्हणजे लोखंडाचे ऑक्साइड आहे. मॅग्नेटाइटचे रेणूसूत्र ोी3ड4 असे आहे. म्हणजेच, मॅग्नेटाइटच्या एका रेणूमध्ये लोखंडाचे तीन अणू आणि ऑक्सिजनचे चार अणू असतात. निसर्गामध्ये खनिजरूपात आढळणाऱ्या या चुंबकाश्माला चिनी लोकांनी ‘चूझ्र्शि’ म्हणजे ‘प्रेमळ दगड’ असे नाव दिले. चिनी लोकांच्या मते, ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला छातीशी धरून मायेने कुरवाळते, अगदी त्याचप्रमाणे चुंबकाचे दगड लोखंडाला आकर्षित करतात. निसर्गाने दिलेल्या या अमूल्य देणगीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून आली आहे.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाषासूत्र : ‘विमोचन’ या शब्दापासून मराठीला सुटका हवी!

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच
मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘हे’ पदार्थ खाण्यास सुरुवात करा; रक्तातील साखरेची समस्या कायमची दूर होईल
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक