रेचेल लुई कार्सन यांना ‘पर्यावरण चळवळीच्या आद्यप्रवर्तक’ म्हटल्यास, वावगे ठरू नये. ‘सायलेंट स्प्रिंग’ या त्यांच्या पुस्तकानंतर जगभरात पर्यावरण दक्षतेच्या मोहिमा घेण्यात येऊ लागल्या. १९०७मध्ये जन्मलेल्या रेचेल समुद्री जीवशास्त्रज्ञ होत्या. रेचेल बालपणापासूनच निसर्ग निरीक्षण, शेतात फिरणे, अफाट वाचन आणि गोष्टी लिहिणे यात काळ व्यतीत करत असत. त्यांनी १९२८ मध्ये जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी मिळवली. प्राणिशास्त्र आणि जेनेटिक्स हे त्यांचे आवडते विषय होते. सुरुवातीला पैशांची सतत चणचण असणाऱ्या रेचेलना नंतर मात्र पुस्तक लिखाणावरच्या मानधनामुळे नोकरी सोडून पूर्णवेळ पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण कार्याला वाहून घेता आले. त्यांच्या पश्चातदेखील त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित झाले. ‘द सेन्स ऑफ वंडर’ हे त्यांच्या निबंधावरचे पुस्तक मुलांमध्ये निसर्गाची आवड आई-वडिलांनी कशी जोपासावी यावर आहे. ‘यू. एस. ब्युरो ऑफ फिशरीज’ येथे सुरुवातीला नोकरी करत असताना त्यांनी ‘द सी अराऊंड अस’ हे पुस्तक लिहून राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्याही नंतर ‘द एज ऑफ द सी’, ‘अंडर द सी विंड’ अशी पुस्तके  लिहिल्यावर त्यांनी आपले लक्ष रासायनिक कीटकनाशकांवर वळवले.

त्यांचे ‘कीटकनाशकांचा परिसंस्थेवर होणारा परिणाम’ या विषयावरील ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक १९६२ मध्ये प्रसिद्ध झाले. कीटकनाशक कंपन्यांनी या पुस्तकाला खूप मोठय़ा प्रमाणात विरोध केला, परंतु ठिकठिकाणी  जनजागृती झाल्यामुळे डीडीटीसारख्या कीटकनाशकांना अमेरिकेत संपूर्ण बंदी घालण्यात आली. डीडीटीला कीटक-बॉम्ब म्हणणाऱ्या रेचेल यांच्या, शास्त्रीय सत्याधार असलेल्या परंतु काव्यात्मक शैलीत लिहिलेल्या या पुस्तकाने जगभरात खूप जागृती आणली. कीटकनाशकांचा वापर आणि कर्करोग होण्याची शक्यता, तसेच ‘कीडनाशकांचा जैविक संचय’ या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यानंतर ‘जैविक कीडनियंत्रण’ या संकल्पनेचा उदय झाला. हे पुस्तक ‘नॅशनल हिस्टोरिक केमिकल लॅण्डमार्क’ असल्याचे अमेरिकन रासायनिक समितीने २०१२ मध्ये जाहीर केले. पर्यावरण संकल्पना तळागाळात पोहोचवल्यानंतर अमेरिकेच्या ‘यू.एस. एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी’चा जन्म झाला.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

वसुंधरा, आकाश, सागर यांच्या प्रभावाखालीच जीवन व्यतीत करणारी रेचेल १९६४ मध्ये कर्करोगाने जर्जर होऊन शेवटी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली. ‘मृत्यूनंतर माझ्या देहाचे दहन करून ती राख निसर्गात विखरून द्यावी’, ही त्यांची इच्छा त्यांची घनिष्ठ मैत्रीण डोरोथी फ्रीमनने पूर्ण केली. निसर्गाशी संपूर्णपणे एकरूप झालेली रेचेल तिच्या असंख्य चाहत्या आणि वाचकांच्या रूपाने आणि अनेक पर्यावरणीय चळवळींतून अजूनही अस्तित्वात आहे.

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org