scorecardresearch

कुतूहल : वृक्षारोपणाचा समृद्ध वसा

कर्नाटक राज्यातल्या टूमकुरू जिल्ह्यातल्या गुब्बी तालुक्यात जन्मलेल्या थिंमाक्कांचा वयाच्या बाराव्या वर्षी हुलिकळ गावातल्या ‘चिकय्या’ यांच्याशी विवाह झाला.

कुतूहल : वृक्षारोपणाचा समृद्ध वसा
साळूमरदा थिंमाक्का

डॉ. नंदिनी विनय देशमुख

कर्नाटक राज्यातल्या टूमकुरू जिल्ह्यातल्या गुब्बी तालुक्यात जन्मलेल्या थिंमाक्कांचा वयाच्या बाराव्या वर्षी हुलिकळ गावातल्या ‘चिकय्या’ यांच्याशी विवाह झाला. त्यांनी लौकिक अर्थाने कुठलेही शिक्षण घेतलेले नव्हते. त्या एक साध्या मजूर म्हणून जवळच्या खाणींमध्ये काम करत असत. या जोडप्याला मूलबाळ झाले नाही, त्यामुळे त्या प्रत्येक झाडाला आपले मूल समजत. साळूमरदा म्हणजे कन्नड भाषेत ‘ओळीत लावलेली झाडे’! त्यांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या कामामुळे त्यांना हे नाव पडले.

थिंमाक्का ज्या गावात राहत तिथे वडाची खूप झाडे होती. आपल्या पतीसमवेत त्यांनी या झाडांपासून वडाची रोपे बनवायला सुरुवात केली. त्यांच्या गावापासून पाच किलोमीटरवर असलेल्या जवळच्या कुडूर गावात त्यांनी ही रोपे लावायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी १०, दुसऱ्या वर्षी १५ आणि तिसऱ्या वर्षी २० अशा रीतीने त्यांनी ही रोपांची संख्या वाढवत नेली.

थिंमाक्का गरीब कुटुंबातल्या, सांपत्तिक स्थिती सुमार, त्यामुळे त्यांच्याकडे वृक्षारोपणासाठी विशेष साधनसामग्री नव्हती. परंतु हे जोडपे रोज चार चार कळशा पाणी वाहून पाच किलोमीटर अंतरावरच्या या सगळय़ा झाडांना घालत असत. या रोपांभोवती काटेरी कुंपण घालून त्यांनी चरणाऱ्या गुरांपासून या रोपांचे रक्षण केले. अशा रीतीने त्यांनी एकूण ३८५ वटवृक्ष लावले. त्यांचे मूल्य पैशात केल्यास १५ लाख रुपये इतके होते. आता मात्र या पूर्ण वाढलेल्या वटवृक्षांची देखभाल कर्नाटक सरकार करत आहे.

२०१९ मध्ये ‘बागेपल्ली- हालागुरू’ या रस्त्याचे रुंदीकरण होणार होते. त्या वेळी या ३८५ वडांवर कुऱ्हाड पडणार होती. परंतु थिंमाक्काने ‘ही माझी मुले आहेत’ असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले आणि कर्नाटक सरकारला हे पटल्यामुळे हा प्रकल्प बदलण्यात आला. ७० वर्षांची जुनी झाडे वाचवण्यासाठी शासनाने पर्यायी रस्ता काढला.

२०१९ मध्ये थिंमाक्काना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंतर बीबीसीने २०१६ मध्ये ‘प्रेरणादायी प्रभावशाली स्त्रियां’च्या यादीत त्यांचा समावेश केला. याव्यतिरिक्त वेगवेगळय़ा वृक्षमित्र संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कार दिले आहेत. १९९७ सालचा ‘इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार’देखील त्यांना प्रदान करण्यात आला. अशा व्यक्तींच्या कथा प्रेरक ठरतात. ‘एकटी व्यक्ती काय करणार!’ हा विचार झटकण्यास मदत करतात.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या