सागरकिनारी गेल्यावर वाळूत आणि खडकाळ किनाऱ्यावर शंख-शिंपले गोळा करण्याचा छंद अनेकांना असतो, पण आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक ठरते. कारण यातून इजा होऊ शकते. बहुधा किनाऱ्यावरच्या वाळूत असलेले मोकळे पांढऱ्या रंगाचे शिंपले सुरक्षित असतात; पण शंखांच्या बाबतीत ‘कोनस टेक्स्टायल’ नावाची प्रजाती धोकादायक असते. एखाद्या कापडावरील सुरेख नक्षीप्रमाणे हा शंख दिसतो. पाण्याबाहेर तो बराच काळ जिवंत राहतो. या शंखामधील विषग्रंथी एका तीक्ष्ण विषदंतामध्ये उघडते. सुईप्रमाणे अणकुचीदार असणाऱ्या त्याच्या पोकळ दातातून त्याचे विष त्वचेखाली टोचले गेल्यास विषबाधा होऊ शकते. कोनस विषबाधेमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षांला सरासरी ३० एवढे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागरकिनारी किंवा उथळ पाण्यात अधूनमधून आढळणारा एक जेलिफिशसारखा जीव फायझेलिया म्हणजेच ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’! पाण्यावर तरंगणाऱ्या या सजीवाच्या पाण्याखालील बाजूवर अनेक लांब शुंडक असतात. या शुंडकांवर असलेल्या काही दंशपेशी-समूहामध्ये हिप्नोटॉक्सिन नावाचे विष असते. या पेशीचा आपल्या त्वचेशी संपर्क आल्यास ते आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करते. यामुळे पोहणारी व्यक्ती हातपाय हलवू शकत नाही. कधी कधी फायझेलियामुळे तीव्र विषबाधा होते. वाळूत असा निळसर रंगाचा प्लास्टिक पिशवीसारखा सागरी जीव आढळल्यास शक्यतो त्याला स्पर्श करू नये. पोहताना त्याचा त्वचेशी संपर्क येऊ शकतो, कारण पाण्यात त्याचे शुंडक किंवा तरंगणारा फायझेलिया त्याच्या पारदर्शकतेमुळे सहसा वेगळा दिसत नाही.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal poisoning by marine aquatic organisms amy
First published on: 09-03-2023 at 03:21 IST