निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्याचे जतन करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. म्हणूनच लौकिक अर्थाने सुशिक्षित नसलेल्या राहीबाई पोपेरे यांचे याबाबतचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी देशी बियाण्यांची बँक विकसित करून ५३ पिकांचे ११४ वाण साठवून ठेवले आहेत. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करून त्यातून निर्माण होणाऱ्या धान्यांचे बियाणे तसेच अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे त्या मडक्यात साठवून ठेवतात. अशा प्रकारचे बियाणे कोणत्याही आंतरराष्ट्रीय बियाणे कंपनीकडे उपलब्ध नाही. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना ‘सीड मदर’ म्हणजेच ‘बीजमाता’ अशी उपाधी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील शेतकरी असलेल्या राहीबाईंनी पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षणाचा वसा घेतला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राहीबाईंचा जन्म १९६४ सालचा. त्यांना ‘जुने ते सोने’ ही शिकवण त्यांच्या वडिलांकडून मिळाली. त्यावरच त्यांनी त्यांचा पुढचा प्रवास केला. ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती’ हा बचत गट स्थापन करून त्यांनी त्यात तीन हजार महिलांना सहभागी करून घेतले. कुक्कुटपालन करून पूरक व्यवसायांची प्रथा आपल्या परिसरात रुजविली. पडीक जमिनींना जीवदान देऊन त्यावर हरित संभार चढवला. त्यांच्या घराच्या परिसरात सुमारे ४००-५०० झाडे वाढविण्यात आली आहेत.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

संकरित बियाण्यांच्या पिकांना खत आणि भरपूर पाणी लागते. शिवाय अशा पिकांचा आहार घेतल्यावर आजारपणे जास्त येतात, मुले कुपोषित राहतात, असे राहीबाईंचे म्हणणे आहे. संकरित बियाण्यांच्या अशा दुष्परिणामानंतर दुर्मीळ होत चाललेल्या बियाण्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न राहीबाईंनी सुरू केले. रायभोग, जिरवेल, वरंगळ, काळभात, ढवळूभात, आंबेमोहोर, तामकुड अशा भाताच्या जातींचे तसेच नाचणी, वरई, राळा अशा धान्यांचे नाहीसे होणे त्यांना अस्वस्थ करते. पावसाचे चार महिने येणाऱ्या सातवे, बडवे यांसारख्या रानभाज्या खाऊन गुजराण करणारे स्थानिक लोकदेखील आता या बियाण्यांचे जतन करू लागले आहेत. तसेच वालाच्या अनेक जातींची बियाणे त्यांनी जपून ठेवले आहेत.

‘बायफ’चे उत्तम शेतकरी पारितोषिक (२०१७), नारी शक्ती पुरस्कार (२०१८), बीबीसीने १०० प्रभावशाली महिलांत केलेला समावेश आणि भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (२०२०) अशा अनेक मानसन्मानांनी राहीबाईंना गौरविण्यात आले आहे. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता मंडळात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनीदेखील त्यांच्या कार्याचा गौरव केला. एका न शिकलेल्या आणि ग्रामीण भागातील महिलेचा हा पद्मश्रीपर्यंतचा प्रवास प्रेरक आहे.

-डॉ. नंदिनी देशमुख