अँड्य्रू इलिकॉट डग्लस हे अमेरिकन अंतराळ विज्ञान अभ्यासक होते. वृक्षाच्या खोडामधील वाढचक्रांचा सौरडागांशी संबंध असल्याचे, त्यांनी सर्वप्रथम सिद्ध केले. हा संबंध प्रस्थापित करताना त्यांच्या असेही लक्षात आले की भूतकाळात जंगलात पसरलेले वणवे, ज्वालामुखीचा उद्रेक, दीर्घ दुष्काळ, सतत पडणारा मुसळधार पाऊस, कीटकांचा विनाशकारी हल्ला, मोठमोठी वादळे या सर्व नैसर्गिक घटकांनी वृक्षांच्या वाढचक्रावर आपआपल्या आठवणी विशेष खुणांच्या माध्यमातून नोंदवून ठेवलेल्या आहेत. वाढचक्रांच्या संख्येवरून वृक्षाचे वय मोजताना डग्लस यांच्या या गोष्टी लक्षात आल्या आणि यातूनच ‘डेंड्रोक्रोनॉलॉजी’ या आधुनिक विज्ञान शाखेचा जन्म झाला, म्हणूनच त्यांना या शास्त्राचे पितामह म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डग्लस यांचा जन्म ५ जुलै १८६७ मध्ये अमेरिकेत उच्चशिक्षित घराण्यात झाला.  ट्रिनिटी महाविद्यालयातून अवकाश शास्त्राचा अभ्यास पूर्ण करून हार्वर्ड वेधशाळा महाविद्यालयात ते रुजू झाले. तेथे त्यांच्यावर पेरू देशामध्ये नवीन वेधशाळा निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या कामातील त्यांचे यश पाहून १८९४ मध्ये त्यांना अ‍ॅरिझोना विद्यापीठाची वेधशाळा निर्माण करण्याचे आमंत्रण आले, त्याचबरोबर मंगळ ग्रह अभ्यास व त्यासाठी दुर्बीण तयार करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यात ते यशस्वी झाले. या यशानंतर डग्लस यांनी ३६ इंच व्यासाची नवीन दुर्बीण तयार केली. आज अ‍ॅरिझोना विद्यापीठात स्वतंत्र इमारतीत असलेली ही दुर्बीण ‘स्टिवार्ड  वेधशाळा’ म्हणून ओळखली जाते. नंतर ते अ‍ॅरिझोना विद्यापीठात अवकाश शास्त्राचे प्राध्यापक झाले, याच काळात त्यांनी सौरडागांचा ‘पाइन’ वृक्षांवर झालेला परिणाम आणि त्या वृक्षांच्या वाढचक्रामध्ये त्याची नोंद पाहिली. वृक्ष केव्हा कोसळू शकतो याचे त्यांनी वाढचक्रांचा अभ्यासावरून केलेले भाकीत अनेकदा तंतोतंत खरे ठरले. वाढचक्रावर सविस्तर अभ्यास व्हावा आणि त्या माध्यमातून भूतकाळामधील वातावरण बदल व्यवस्थित समजून घेता यावेत, यासाठी त्यांनी अ‍ॅरिझोना विद्यापीठात १९३७ मध्ये वृक्ष वाढचक्र संशोधन प्रयोगशाळा सुरू केली. डग्लस यांच्या संशोधनाचा पुरातत्त्व विभागास सर्वात जास्त फायदा झाला.

पूर्वी अनेक पुरातन वास्तू, लाकडाच्या उभ्या खांबापासून तयार करत. वाढचक्राच्या आधारे आता हे बांधकाम किती वर्षे जुने आहे, कुणाच्या काळात झाले याचा सहज शोध घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लाकडावर काढलेली चित्रे, पेंटिंग्ज यांचा इतिहास आणि कालखंडसुद्धा डग्लस यांच्या तंत्रज्ञानामुळे शोधणे सोपे झाले आहे. विद्यार्थी आणि तरुण शास्त्रज्ञ यांना प्रेरणादायी ठरलेल्या या महान शास्त्रज्ञाचा वयाच्या ९२ व्या वर्षी मृत्यू झाला.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal result andrew ellicott douglas american space science scholar ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST