मनीषा उगले, मराठी विज्ञान परिषद

लहानपणी छऱ्याच्या बंदुकीने सहज खेळताना मारलेल्या पिवळय़ा कंठाच्या एका चिमणीने सलीम अली यांचे आयुष्यच बदलून टाकले. तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याच्या निमित्ताने त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’त पाऊल टाकले. तिथे भुसा भरून ठेवलेले अनेक पक्षी त्यांना पाहायला मिळाले आणि पक्ष्यांच्या अनोख्या दुनियेशी त्यांचे मैत्र जुळले. पुढे भावाच्या व्यवसायात मदत करण्यासाठी ते बर्मा (म्यानमार) येथे गेले. तिथेही त्यांनी आपल्या पक्षी निरीक्षण छंदाला भरपूर वेळ दिला. भारतात परत आल्यानंतर त्यांनी चरितार्थासाठी गाइडची नोकरी केली. या दरम्यान त्यांचा परिचय डॉ. इरविन स्ट्रॅसमन यांच्याशी झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम यांनी वर्षभर पक्ष्यांचा अभ्यास केला. जर्मनीत जाऊन त्यांनी पक्षीशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतले. मायदेशी परतले तेव्हा सलीम यांची आधीची नोकरी गेलेली होती, आर्थिक परिस्थितीही बिकट झाली होती. पत्नी तेहमिना यांच्या मदतीने ते अलिबागजवळील किहीम येथे राहायला गेले. तिथल्या वास्तव्यात त्यांनी सुगरण पक्ष्यांचा सखोल अभ्यास केला. त्यासंबंधी एक शोधनिबंध त्यांनी बीएनएचएसच्या जर्नलसाठी लिहिला. या दर्जेदार शोधनिबंधाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्षीतज्ज्ञ असा लौकिक मिळवून दिला.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Thane Police, Arrest Parents, for Allegedly Murdering, One and a Half Year Old Daughter, Investigation Underway, crime in thane, crime in mumbra, parents allegedly murder daughter
मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर

त्यांची ख्याती ऐकून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना पक्षीनिरीक्षण मोहिमांसाठी सन्मानपूर्वक बोलवायला सुरुवात केली. डॉ. सलीम यांनी भारतभर अशा अभ्यासमोहिमा आखल्या. पक्ष्यांच्या जीवनशैलीसंबंधी अनेक मौलिक निरीक्षणे नोंदवली. १९४३ मध्ये त्यांनी लिहिलेले ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस’ हे पुस्तक फार महत्त्वाचे ठरले. पक्षीअभ्यासासंदर्भात त्यांनी इतरही बरीच पुस्तके लिहिली. डॉ. सलीम अली यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्ष्यांसाठी वाहून घेतले. ‘पक्षी हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे,’ अशी त्यांची आग्रही भूमिका होती.

अनेक पक्षीअभयारण्ये आणि उद्याने उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. केरळमधील सायलेंट व्हॅली उद्यानात होऊ घातलेल्या व पर्यावरणास हानिकारक असलेल्या, प्रकल्पांना सलीम अलींनी जोरदार विरोध केला. ‘पक्ष्यांचा अभ्यास भुसा भरून संग्रहालयात ठेवून करायचा नसतो. त्यांना निसर्गात बागडू द्यावे, तीच त्यांचा अभ्यास करण्याची योग्य जागा आहे,’ असे ते म्हणत. त्यांच्या कार्यासाठी त्यांना १९६७ साली ब्रिटिश पक्षीतज्ज्ञ संघाचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. भारत सरकारच्या पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. २० जून १९८७ रोजी त्यांचे निधन झाले. भारतातील पक्षीअभ्यासाची सुरुवात खऱ्या अर्थाने डॉ. सलीम अली यांच्या पासून झाली, असे मानले जाते.