– मकरंद भोसले
थंडीच्या दिवसांत, हव्याशा वाटणार्या रात्रीच्या गुलाबी थंडीबरोबर नकोसं वाटणारं सकाळचं धुकंसुद्धा आपल्या वाट्याला येतं. या धुक्यामुळे आपल्या डोळ्यांना काही फुटांवरचंसुद्धा दिसेनासं होतं. दृश्यमानता कमी झाल्याने अपघातांची शक्यता वाढते. विमानं आणि रेल्वेगाड्या रद्द होतात. माणसाच्या आरोग्यावर धुक्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
खरं तर धुकं म्हणजे जमिनीलगत असलेला ढगच असतो. धुक्यात हवेत तरंगणारे पाण्याचे सूक्ष्म थेंब असतात. धुकं हे प्रामुख्याने थंड हवामानात, विशेषत: हिवाळ्यात सकाळी पडतं. कारण हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्याने रात्री आणि पहाटे हवा आणि जमीन थंड होते. धुकं पडण्यासाठी हवेतली आर्द्रता साधारण ९५ टक्के किंवा त्याहून अधिक असावी लागते. हवेत असलेली ही आर्द्रता म्हणजेच पाण्याचं बाष्प हे जेव्हा या थंड वातावरणाच्या संपर्कात येतं, तेव्हा हवेचं तापमान अचानक कमी होतं. अशा वेळी हवेची बाष्प साठवून ठेवण्याची क्षमता संपते आणि हवेत असलेल्या या बाष्पाचं थंडीमुळे पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये रूपांतर होतं. हे पाण्याचे थेंब हवेत तरंगत राहतात आणि त्यामुळे धुकं तयार होतं.
अजून एका परिस्थितीत धुकं तयार होतं. जेव्हा उष्ण आणि दमट हवा अचानक थंड जमिनीवरून किंवा थंड पाण्याच्या प्रवाहावरून वाहते, तेव्हाही त्या उष्ण हवेतील बाष्प थंड होऊन त्याचं धुक्यात रूपांतर होतं. अशा प्रकारचं धुकं हे आपल्याला समुद्रकिनारी पाहायला मिळतं. जमिनीच्या पृष्ठभागाजवळील हवा जास्त थंड होते. त्यामुळे हे बाष्पकण तिथेच साचतात. तिथल्या धुळीतल्या कणांवर हे थेंब जमा होतात आणि हवेत तरंगतात. यामुळे वातावरण धूसर दिसतं. ही धूसरता जमिनीच्या जवळ म्हणजे साधारण १ ते २ मीटर्स उंचीपर्यंत असते, म्हणून आपण धुकं ‘पडलंय’ असं म्हणतो.
हवेत जेवढे जास्त धूलिकण किंवा धुराचे कण असतील, तेवढं धुकं जास्त दाट होतं. कारण असे कण हे ‘केंद्रक’ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर पाण्याचे थेंब जमा होतात.
जेव्हा हवेत प्रदूषण जास्त असतं, तेव्हा हे प्रदूषक नैसर्गिक धुक्यात मिसळतात. या मिश्रणाला धुरकं किंवा ‘स्मॉग’ म्हणतात. याला धुराचा किंवा रसायनांचा उग्र वास येतो. अशा धुरक्यामुळे फुप्फुसांचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे त्रास होतात.
सूर्य उगवल्यानंतर मात्र हे धुकं विरतं. सकाळी सूर्यप्रकाशामुळे हवा गरम होते आणि पाण्याचे हे सूक्ष्म थेंब पुन्हा वाफेत बदलतात, त्यामुळे धुकं हळूहळू नाहीसं होतं. हिवाळ्यात सकाळी सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे धुकं बराच वेळ टिकून राहतं.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
