एखादी वस्तू आपल्याला कधी दिसते? प्रकाश त्या वस्तूवर पडला आणि ती वस्तू अपारदर्शक असेल, तर प्रकाशाचा काही भाग त्या वस्तूमध्ये शोषला जातो तर काही भाग त्या वस्तूवर आपटून परत फिरतो. या परत फिरलेल्या प्रकाशातले काही किरण आपल्या डोळ्यांत शिरतात आणि आपल्याला ती वस्तू दिसते.
दृश्य प्रकाशाचे विविध रंग हे त्याच्या वेगवेगळ्या तरंगलांबीवर अवलंबून असतात. प्रत्येक अपारदर्शक वस्तू, तिच्यावर पडणार्या प्रकाशाचा जो काही भाग परावर्तित करते, त्याला परावर्तित प्रकाश म्हणतात. या परावर्तित प्रकाशात ज्या तरंगलांबीचं प्रमाण जास्त त्या रंगाची ती वस्तू दिसते. उदाहरणार्थ पोपट हिरवा दिसतो कारण त्याची पिसं, हिरव्या रंगाचा प्रकाश जास्त परावर्तित करतात आणि बाकीचा प्रकाश शोषून घेतात. कोणत्या रंगाचा आणि किती प्रकाश परावर्तित करायचा, हे त्या वस्तूच्या पृष्ठभागाचे गुणधर्म ठरवतात .
आता परावर्तनाचा आणखी एक गुणधर्म बघू. वस्तूचा पृष्ठभाग जितका जास्त गुळगुळीत आणि सपाट, तितकी ती वस्तू जवळजवळ संपूर्ण प्रकाश परावर्तित करते. एवढंच नव्हे तर ही परावर्तित किरणं एकमेकांना समांतर आणि नेटकी असतात. त्यामुळे त्यामध्ये समोरच्या वस्तूंचं प्रतिबिंब दिसतं. जेवढा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट तेवढं स्पष्ट प्रतिबिंब त्यावर उमटतं.
याउलट खडबडीत पृष्ठभागावरून परावर्तित होणारा प्रकाश चहूबाजूला विखुरतो. त्यामुळे त्यात प्रतिबिंब दिसू शकत नाही. नवीन चकचकीत स्टीलच्या भांड्यात स्पष्ट प्रतिबिंब दिसतं. पण नंतर त्याच भांड्याला घासून घासून चरे गेले, त्याचा पृष्ठभाग थोडासा खडबडीत झाला की त्या प्रतिबिंबाची स्पष्टता कमी होते.
प्रतिबिंब पाहण्याचा सोपा मार्ग म्हणजे आरशात पाहणं. आरशात प्रतिबिंब दिसतं, ते काचेमुळे नव्हे तर काचेवर लावलेल्या परावर्तन करणार्या थरामुळे! हा थर अतिशय गुळगुळीत असतो. तो साधारणपणे चांदीचा किंवा ॲल्युमिनियमचा असतो. असे पृष्ठभाग त्यांच्यावर पडणार्या प्रकाशापैकी जवळपास सगळा प्रकाश परावर्तित करतात. या परावर्तित प्रकाशात सगळेच रंग समाविष्ट असतात. त्यामुळे दिसणारं प्रतिबिंब आणि मूळ वस्तू यांचे रंग सारखेच असतात. प्रतिबिंबाचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे मूळ वस्तू आणि प्रतिबिंब यांत डाव्या आणि उजव्या बाजूंची झालेली अदलाबदल! त्यामुळे प्रत्यक्षात तयार होणारी प्रतिमा ही खरं म्हणजे पुढून मागे अशी फिरलेली असते. कागदावर लिहिलेली अक्षरं कागदाच्या मागच्या बाजूनं पाहिली की जशी दिसतात तशी. म्हणून जेव्हा आपला मेंदू ही प्रतिमा पाहतो तेव्हा त्याला ती उलट झालेली वाटते.
सुमेध सावंत, मराठी विज्ञान परिषद
