कुतूहल : पारंपरिक वाणांची बीज बँक

वेगवेगळय़ा हंगामांतील विविध पारंपरिक पिकांच्या निरोगी आणि सर्वोत्तम बिया गोळा करून त्या बांबूच्या टोपल्यांमध्ये अथवा मातीच्या भांडय़ांत र्निजतुकीकरण करून साठवून ठेवल्या जातात, या संचयाला बीज बँक असे म्हणतात.

kutuhal
कुतूहल : पारंपरिक वाणांची बीज बँक

वेगवेगळय़ा हंगामांतील विविध पारंपरिक पिकांच्या निरोगी आणि सर्वोत्तम बिया गोळा करून त्या बांबूच्या टोपल्यांमध्ये अथवा मातीच्या भांडय़ांत र्निजतुकीकरण करून साठवून ठेवल्या जातात, या संचयाला बीज बँक असे म्हणतात. ही पद्धत इतर अनेक संस्थांबरोबरच ‘बायफ’नेही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर विकसित केली आहे. यामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाटा आहे.

बीज बँक ही पारंपरिक वाणांच्या साठवणीसाठीच वापरली जाते. शेतकरी त्यांना हवे असणारे वाण या बँकेतून घेऊन जातात आणि त्यांचे उत्पादन घेतल्यावर तेच बियाणे बँकेला दुपटीने परत करतात. ज्या महिला अशा बीज बँका सांभाळतात त्यांना बीजमाता म्हणतात. बीज बँक हा त्यांच्यासाठी आर्थिक स्रोतसुद्धा आहे. पूर्वी शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामांमधील निरोगी, उत्तम दर्जेदार टपोऱ्या दाण्यांची कणसे, शेंगा, ओंब्या यांना पिकाची वाढ होत असतानाच हेरून नंतर कापून घरामध्ये उंच आढीला बांधून ठेवत असत आणि हेच बियाणे पुढील हंगामासाठी वापरले जात असे. अर्थात असे बियाणे त्या शेतकऱ्यापुरतेच मर्यादित असे. बीज बँक ही अनेकांसाठी उपलब्ध असते.

या पद्धतीत शेतकऱ्याकडे जाऊन पारंपरिक बियाणे गोळा करणे, नंतर बांबूच्या टोपल्यांत लिंबाचा पाला अथवा राखेचा वापर करून साठवणे आणि बाहेरून शेणाने लिंपून घेऊन हवाबंद करणे हे तीन मुख्य टप्पे येतात. असे बियाणे १० वर्षांपर्यंतसुद्धा टिकू शकते. काही बीजमाता त्यांच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने या सर्व बियाणांची पेरणी करून वैज्ञानिक पद्धतीने बीज गोळा करून घरातच विक्रीसाठी ठेवतात. वातावरण बदलाच्या संकटात अशा बीज बँकांची सध्या जास्त गरज आहे, कारण आज फक्त ३०मुख्य पिकेच जगाला अन्न पुरवत आहेत आणि त्यातही गहू, तांदूळ आणि मका यांचा वाटा  ६० टक्के आहे. यांच्या हव्यासापोटी आज आपली हजारो मौल्यवान पारंपरिक पिके नष्ट झाली आहेत आणि कितीतरी नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत. गहू, तांदूळ, मका यापासून आपणास अन्न सुरक्षा मिळते तर, पारंपरिक पिकांपासून पोषणमूल्य. आज आपण याच पोषणमूल्यापासून वंचित आहोत म्हणूनच कुपोषण वाढत आहे.

आज महाराष्ट्रात अनेक लहान-मोठय़ा बीज बँकांतर्फे पारंपरिक दुर्मीळ वाणांचे संवर्धन होत आहे. प्रत्येक गावात पारंपरिक पिकांची शेती करणाऱ्यांचा शोध घेणे, त्यांकडून बियाणे मिळविणे आणि गावपातळीवर त्यांची बीज बँक विकसित करणे ही यापुढे काळाची गरज असणार आहे.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal seed bank traditional varieties seasons crops healthy ysh

Next Story
कुतूहल : ‘बायफ’ संस्था आणि ग्रामविकास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी