Kutuhal sponge of the sponge usage Artificially Marine life for bathing ysh 95 | Loksatta

कुतूहल : स्पंज

स्पंजचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो. हल्ली ते कृत्रिमरीत्या बनवले जातात. मात्र प्राचीन काळात ‘स्पंज’ हा रंध्री संघातील सागरी जीव स्नानासाठी वापरण्यात येत असे.

कुतूहल : स्पंज

हर्षल कर्वे, मराठी विज्ञान परिषद

स्पंजचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो. हल्ली ते कृत्रिमरीत्या बनवले जातात. मात्र प्राचीन काळात ‘स्पंज’ हा रंध्री संघातील सागरी जीव स्नानासाठी वापरण्यात येत असे. स्पंजच्या शरीरावर बारीक रंध्रे असतात आणि त्यातून तो सतत पाणी गाळत असतो. यांची शरीररचना ही पेशी स्तरावरील असते. मात्र त्यांच्यात ऊती तयार झालेल्या नसतात. या प्राण्यांना स्वत:ला चलनवलन करता येत नाही.  आधाराला चिकटून राहात असल्यामुळे बसल्या ठिकाणी पाणी गाळण्याचे कार्य ते वेगाने करत असतात. या गाळलेल्या पाण्यामधून त्यांचे अन्नप्राशन होत असते. स्पंजच्या शरीरात काही विषारी द्रव्ये संचयित स्वरूपात आढळतात. स्पंजावरती उदरभरण करणारे इतर सागरी प्रजाती- उदाहरणार्थ ‘सी स्लग्स’- हे विष स्वत:च्या शरीरात घेऊन त्याचा वापर स्वत:च्या संरक्षणासाठी करतात. अशा प्राण्यांना भक्षण करण्यासाठी जे भक्षक येतात त्यांनाच या विषाने बाधा होऊ शकते.

वैविध्यपूर्ण रासायनिक संयुगांचे अफाट उत्पादन करत असल्यामुळे स्पंजला ‘सागरी वातावरणातील रासायनिक कारखाना’ मानले जाते. अलेक्झांड्रियन चिकित्सक आणि रोमन इतिहासकार प्लिनिअस यांनी स्पंज आणि औषधांमधील संबंध याचे उत्कृष्टरीत्या वर्णन केले आहे. प्लिनिअसने उष्माघाताविरुद्ध स्पंज वापरण्याची शिफारस केली आणि त्या काळी सर्व प्रकारच्या जखमा, पोटदुखी, संसर्गजन्य रोगांविरोधात स्पंज वापरले गेले. पूर्वी, डॉक्टर रक्त गोठण्यासाठी भरपूर आयोडीनसह संतृप्त असलेल्या स्पंजचा वापर करायचे किंवा रुग्णांना भूल देण्यासाठी स्पंज आणि काही विशिष्ट वनस्पतींचा अर्क वापरायचे. आजसुद्धा, याच गुणधर्माचा वापर करून, काही सागरी संशोधक अभ्यासासाठी नमुने जतन करताना स्पंजचा वापर करतात.

आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यावर, स्पंजमधून टेरपेनोइड्स, अल्कलॉइड्स, पेप्टाइड्स आणि पॉलिकेटाइड्स अशा विविध प्रकारची संयुगे विस्तृत प्रमाणात उपलब्ध असल्याचे कळले. यांचा उपयोग कर्करोगाविरोधी, जिवाणू-विषाणूविरोधी आणि दाह-नाशक औषधांमध्ये केला जातो. तसेच स्पंजमध्ये मलेरियासारख्या रोगाविरुद्ध औषधे पुरवण्याची क्षमता असल्याचेदेखील ज्ञात झाले आहे. स्पंजच्या या गाळून अन्नप्राशन करण्याच्या प्रयत्नांत इतर सागरी सूक्ष्म जीवदेखील त्यांच्या ‘स्पोन्जोसिल’ या देहगुहेत राहतात. या प्रक्रियेमुळे त्याच्या परिसरात असलेल्या इतर प्रजातींच्या पेशी त्याच्या शरीरात अडकून राहू शकतात. अशा स्पंजचे जनुकीय (डीएनए) परीक्षण केल्यास त्यावरून इतर प्रजातींची ओळखदेखील पटू शकते. एखाद्या ठिकाणची जैवविविधता त्वरित मापन करायची असल्यास ही पद्धत सुलभ पडू लागली आहे.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2022 at 00:02 IST
Next Story
भाषासूत्र : ताकाआधी म्हशीचे भांडण..