डॉ. सीमा खोत, मराठी विज्ञान परिषद
सिल्फ्रा घळ (दरी) हा निसर्गाचा एक अद्भुतरम्य चमत्कार मध्य अटलांटिक सागरी पर्वतरांगेत वसलेल्या ‘आइसलँड’ या द्वीपदेशात पाहता येतो. सुमारे १५० दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय हालचालींमुळे उत्तर अमेरिका आणि युरेशिया हे खंड एकमेकांपासून विलग होऊन त्यामध्ये एक मोठी घळ निर्माण झाली. १७८९ साली आइसलँडमध्ये झालेल्या भूकंपात ही घळ दिसून आली.




या दरीचे भौगोलिक वैशिष्टय़ असे की यात असणाऱ्या काही अरुंद जागी दोन्ही हात फैलावून एकाच वेळी दोन खंडांना स्पर्श केला जाऊ शकतो. येथील पाणी पाचू आणि नीलमण्यासारखे चमकणारे जगातील सर्वात स्वच्छ पाणी समजले जाते व पाण्यात १०० मीटरपलीकडचेही दिसते. या वैशिष्टय़ांमुळे जगभरातून येथे स्कुबा डायिव्हग आणि स्नॉर्केलिंग करण्यासाठी पर्यटक येतात. पृथ्वीच्या उघडलेल्या मुखात विहार केल्याचा आनंद त्यांना येथे मिळतो. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही येथे करण्यात आले आहे.
या घळीतील पाणी हे जवळच्या हिमनदीचे वितळलेले पाणी असून ते लाव्हारसाच्या खडकाळ भूभागातून संथ गतीने वाहत येते. हे खडक सच्छिद्र असल्याने हे पाणी नैसर्गिकरीत्या गाळले जाऊन भूमिगत झऱ्यांद्वारे घळीत रिते होते. हिमनदी ते सिल्फ्रा घळ हा पाण्याचा प्रवास ३० ते १०० वर्षे इतका प्रदीर्घ असू शकतो. घळीतील तापमान सदैव २ ते ४ अंश सेल्सिअस असले तरी जमिनीखालील झऱ्यातून पाणी सतत पाझरत असल्याने, ते कधीही गोठत नाही. दरवर्षी दोन सेंटिमीटर इतकी रुंदावत जाणारी सिल्फ्रा घळ तीन भागांत विभागलेली आहे.
घळीच्या सुरुवातीच्या भागाला ‘डीप क्रॅक’ म्हणतात, जो सर्वात अरुंद असून पुढे रुंदावत जातो. येथे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने पाणबुडे प्रचंड वेगाने पुढे ढकलले जातात. दुसरा भाग सर्वात विस्तीर्ण असून तो ‘दी हॉल’ या नावाने व त्यापुढील भाग ‘कॅथ्रेडल’ या नावाने ओळखला जातो. शेवटचा ‘ब्लू लगून’ हा भाग उथळ तलावाप्रमाणे असून त्यात पर्यटक मुक्तपणे तरंगतात. येथील पाण्यात काही ट्राउट, चाड असे मासे वगळता इतर जलचर फारसे दिसत नाहीत. मात्र समुद्री गवताने आच्छादलेले तळाचे खडक एकूण सौंदर्यात भरच घालतात.