scorecardresearch

कुतूहल: समुद्रतळाच्या अभ्यासाची साधने

समुद्राच्या तळाशी असणारे सजीव, तेथील वाळू, दगड इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी ‘ड्रेज’ आणि ‘ग्रॅब’ ही साधने संशोधन नौकांच्या डेकवरून ज्या ठिकाणचा अभ्यास करणे अपेक्षित आहे अशा ठिकाणी पाण्याखाली सोडली जातात.

kutuhal
समुद्रतळाच्या अभ्यासाची साधने

समुद्राच्या तळाशी असणारे सजीव, तेथील वाळू, दगड इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी ‘ड्रेज’ आणि ‘ग्रॅब’ ही साधने संशोधन नौकांच्या डेकवरून ज्या ठिकाणचा अभ्यास करणे अपेक्षित आहे अशा ठिकाणी पाण्याखाली सोडली जातात.ड्रेज हे एखाद्या पिशवीसारखे जाळे असते. त्याला जाडजूड दोरखंड किंवा धातूच्या साखळय़ा असतात. या पिशवीचे तोंड स्टीलच्या चौकटीने उघडे ठेवले जाते. समुद्रतळाशी हे साधन घसरले पाहिजे म्हणून त्याला घसरगाडीप्रमाणे सरकते पट्टे लावले जातात. ड्रेजला हलकेच समुद्रतळाशी सोडले जाते. त्यानंतर नौका हळुवार पुढे पुढे जाते आणि ड्रेज सावकाश खेचला जातो. स्टीलच्या चौकटीची खालची बाजू अलगद तलस्थ सजीवांना उपटून काढते आणि ते ड्रेजमध्ये अडकतात. ड्रेजसारख्या जाळय़ांचा वापर काही प्रजातींच्या मासेमारीसाठीदेखील केला जातो. विशेषत: शिणाणे, शिंपल्या, कालवे, इत्यादी मृदूकाय-खाद्य ड्रेजने पकडता येते. ड्रेजसारखे दिसणारे ‘ट्रोल’ जाळे हे मासेमारीसाठी वापरले जाते. मात्र ‘ड्रेजिंग’ आणि ‘ट्रोलिंग’ यात एक फरक आहे. ड्रेजिंग उथळ पाण्यात केले जाते तर ट्रोलिंग ही खोल पाण्यात सरसकट मासे प्रजातींची धरपकड करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत आहे.

ठरवलेल्या आणि आखलेल्या अंतरावरचेच सजीव अभ्यासायचे असतील तर ग्रॅबचा वापर होतो. ग्रॅब वापरताना संशोधन नौका थांबवली जाते. ग्रॅबला चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन जबडे असतात. ग्रॅब पाण्यात उतरवतात त्या वेळी हे जबडे उघडे असतात. पण एकदा का हा ग्रॅब समुद्रतळाला आपटला की त्याचे जबडे गच्च बंद होतात. त्यानंतर त्याला वर घेतले जाते. वर खेचत असताना त्याचे दोन्ही जबडे मिटलेले असतात, त्यामुळे आतला नमुना सुरक्षित राहतो. मिळालेला नमुना चाळणीवर पसरून त्यावर पाण्याचे फवारे मारतात. त्यातील वाळू, माती इत्यादी दूर करून निव्वळ तलस्थ सजीव उरले की त्यांचा अभ्यास करता येतो. ज्यांनी १९३३ मध्ये ग्रॅब बनवला त्या जोहान व्हान व्हिन यांच्या स्मरणार्थ ग्रॅबला ‘व्हान व्हिन ग्रॅब’ असे म्हटले जाते. साधारण पाच किलो वजनाचे हे ग्रॅब छोटय़ा आकाराचेही असू शकते. त्याउलट ‘पीटरसन ग्रॅब’ हे जड उपकरण पीटरसन यांनी १९३० मध्ये गोडय़ा पाण्यातील सजीवांचा अभ्यास करण्यासाठी तयार केले होते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 01:06 IST

संबंधित बातम्या