समुद्रकिनाऱ्यांवर असणाऱ्या वाळूत आपणास अनेक तऱ्हेच्या वनस्पती आढळतात. काही छोटी फुलझाडे, तसेच छोटय़ा गवताचे प्रकार, काही झुडपे, तर काही वाढणारे मोठे वृक्ष. मुख्यत्वे किनाऱ्याजवळ सुरूच्या मोठय़ा वृक्षांची वने तयार केली जातात, याचा उपयोग किनाऱ्याची धूप थांबवणे, वाळू धरून ठेवणे यासाठी होतो. या झाडांच्या सालीचे काही औषधी उपयोगही आहेत. सुकलेल्या फळांचा उपयोग शोभेच्या शुष्क पुष्परचनेत करतात. सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमातून या वृक्षांची लागवड केली गेली आहे. या वनांचा उपयोग किनाऱ्यावरील पर्यटनास चालना देण्यासाठीही केला जातो. समुद्रावर सहलीला आलेले अनेक पर्यटक या सुरूच्या वनांमध्ये वनभोजन करतात. किनाऱ्यांवर सुरूव्यतिरिक्त इतरही अनेक वनस्पती आढळतात.
किनाऱ्यावरील वाळूच्या प्रकारानुसार अनेक वेळा या वनस्पती स्थलकालानुसार बदलतात. काही छोटी फुले येणारी झाडे ही हंगामानुसार बदलतात. त्यांची वाढ बियांपासून होते व काही काळानंतर त्यांची जागा इतर काही वनस्पती घेतात. वाळूचा पोत, रंग त्यात राहाणारे प्राणी, भरती-ओहोटीनुसार होणारी मातीची धूप याचा एकत्रित परिणाम या लहान वनस्पतींवर होतो. यातील काही लहान वनस्पतींची पानेही बऱ्यापैकी पाणी साठवल्यामुळे जाड झालेली असतात. पानांचा मांसलपणा हा या वनस्पतींचे या परिसंस्थेशी अनुकूलन दर्शवितो. आजूबाजूला खारे पाणी असताना या पानांमध्ये साठवलेले पाणी आपल्या चयापचय क्रियेसाठी वापरले जाते. ‘मोरस’ हे या प्रकारचे किनाऱ्यावर आढळणारे झाड आहे. या झाडाची पाने आकाराने खूप छोटी व मांसल असतात. ‘धाप’ हेदेखील असेच एक मांसल पानांचे झाड वाळूमध्ये आढळते. त्याची पाने आकाराने मोठी व रुंद, मांसल असतात. खोडाचा रंग लालसर असतो. किनाऱ्यावरील वाळूत ते दाटीवाटीने पसरून वाढलेले दिसते.




किनाऱ्यावर मर्यादा वेलीच्या फांद्या लांबवर पसरलेल्या असतात. या वेलीच्या आच्छादनाने खालची वाळू ही जागेवर धरून ठेवली जाते. अन्यथा वाळूचे हलके कण वाऱ्याने सहज उचलले जाऊन दूरवर पसरतात. या वेलीची पाने जाडसर आणि दोन भागांत विभागलेली असतात. वेलीवर जांभळय़ा रंगाची घंटेच्या आकाराची मोठी फुले आढळतात.
डॉ. स्मिता जाधव, मराठी विज्ञान परिषद
( मर्यादा वेल )