रक्तदाब म्हणजे ‘ब्लड प्रेशर’ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. कधीही कोणत्याही आरोग्याच्या तक्रारीसाठी आपण डॉक्टरकडे गेलो तर लगेच आपला रक्तदाब का मोजला जातो, हे आपल्याला माहीत नसतं. रक्तदाब म्हणजे काय? याचा नेमका अर्थ समजून घेणं थोडं गुंतागुंतीचं आहे.
आपल्या शरीरात सगळीकडे रक्त फिरवण्याचं काम हृदयाचं असतं. हृदय हा एक स्नायूंचा पंप असतो असं आपण म्हणू शकतो. हृदयाची उजवी बाजू ऑक्सिजनची कमतरता असलेलं रक्त ऑक्सिजन घेण्यासाठी फुप्फुसांकडे पाठवते आणि डावी बाजू ताजं ऑक्सिजनयुक्त रक्त धमनीतून शरीराच्या सर्व भागांकडे पोहोचवते. हृदय आपल्या शरीराच्या साधारणपणे मध्यभागी असतं त्यामुळे पायाच्या टोकापासून डोक्यापर्यंत रक्त पोहोचावं म्हणून हृदयातून अतिशय जोराने रक्त बाहेर फेकलं जातं. यासाठी आपलं हृदय सतत आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. म्हणजेच धडधडत असतं. ज्या वेळी हृदय धडधडतं त्या वेळी रक्त अतिशय जोरात धमन्यांमध्ये ढकललं जातं. धमन्यांच्या भिंतीवर या रक्तामुळे जो दाब निर्माण होतो त्यालाच आपण ‘रक्तदाब’ म्हणतो. रक्तदाब अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे शरीरातील सर्व अवयव, उतींपर्यंत रक्त पोहोचतं आणि त्यांच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ऑक्सिजन आणि इतर पोषक घटक त्यांना शुद्ध रक्तामुळे मिळतात.
रक्तदाब मोजण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ नावाचं उपकरण वापरलं जातं. यात एक पट्टा असतो जो दंडाभोवती गुंडाळला जातो. याला ‘कफ’ म्हणतात. हा कफ फुगवला की काही क्षणांसाठी रक्तप्रवाह रोखला जातो आणि त्यानंतर तो हळूहळू हवा सोडून सैल केला जातो आणि त्याच वेळी धमन्यांमधील दाब मोजला जातो.
रक्तदाबाची नोंद १२०/८० अशा दोन अंकांच्या स्वरूपात केली जाते. यातला १२० हा अंक सिस्टोलिक दाब दर्शवतो. ज्या वेळी हृदय सक्रियपणे आकुंचन पावून धमन्यांमध्ये रक्त फेकतं त्या वेळी धमन्यांच्या भिंतीवर जो दाब निर्माण होतो तो सिस्टोलिक दाब असतो. ८० हा अंक डायस्टोलिक दाब दर्शवतो. हा दाब हृदयाच्या दोन ठोक्यांमधला म्हणजे आकुंचनामधला विश्रांतीच्या काळातला असतो. सामान्यत: जर रक्तदाब १३०/९० असा किंवा यापेक्षा जास्त असेल तर ‘उच्च रक्तदाब’ आणि ९०/६० किंवा यापेक्षा कमी असेल तर ‘निम्न रक्तदाब’ समजला जातो. अर्थात त्याला इतर मोजमापांची जोड दिली जाते.
रक्तदाब हा आरोग्याचा महत्त्वाचा मापदंड आहे. यावरून आपल्याला आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या कशा प्रकारे कार्य करत आहेत याबद्दल माहिती मिळते. चांगल्या आरोग्यासाठी रक्तदाबावर लक्ष ठेवणं आणि तो योग्य पातळीवर राखणं अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. माधवी ठाकूरदेसाई
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
