सूर्यमालेतील इतर सभासदांपेक्षा आपल्या शेपटीमुळे वेगळे दिसणारे सभासद म्हणजे धूमकेतू! धूमकेतूंनी पृथ्वीच्या आणि पर्यायाने जीवसृष्टीच्या उत्क्रांतीत मोलाची भूमिका बजावली आहे. सूर्यमाला तयार होण्याच्या सुरुवातीच्या प्रचंड उलथापालथीच्या काळात, तयार होत असलेल्या पृथ्वीवर अनेक धूमकेतू आदळले. या प्रक्रियेत पाणी, अनेक सेंद्रिय मूलद्रव्ये आणि जीवनावश्यक घटक तयार होण्यासाठीची ऊर्जा, या धूमकेतूंनी पृथ्वीला बहाल केली.

सूर्यमालेतील ग्रह जसे सूर्यप्रदक्षिणा करतात तसेच धूमकेतूही सूर्याभोवती प्रचंड लांब पण लंबवर्तुळाकार प्रदक्षिणा करत असतात. जेव्हा आपल्याला एखादा धूमकेतू दिसू लागतो तेव्हा त्याची शेपटी आपलं लक्ष वेधून घेते. धूमकेतूला प्रत्यक्षात दोन शेपट्या असतात, थोडी वक्र दिसणारी धुळीची पांढरी शेपटी आणि सरळ दिसणारी वायूंची निळसर शेपटी!

सूर्यापासून दूरवर असताना धूमकेतूला एकही शेपटी नसते. मात्र तो जसजसा सूर्याजवळ येत जातो, तसतसे सूर्याच्या उष्णतेमुळे त्याच्या गाभ्यातील काही पदार्थ वितळू लागतात. वितळलेल्या या पदार्थांचा सौरवाताशी म्हणजे सूर्याकडून येणार्‍या विद्युत प्रभारित कणांच्या प्रवाहाशी संपर्क आला, की ते गाभ्यातून बाहेर फेकले जातात. हे बाहेर फेकलेले पदार्थ म्हणजेच धूमकेतूच्या शेपट्या!

गाभ्यातून वितळून बाहेर पडलेल्या अनेक पदार्थांपैकी बाष्प, अमोनिया, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड यांसारख्या वायूंवर सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांमुळे धन विद्युतभार येतो. धन विद्युतभार असणार्‍या या वायूंवर सौरवात आणि सूर्यकिरणांच्या दबावासह, सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचाही प्रभाव पडतो. त्यामुळे ते सूर्य आणि धूमकेतू यांना जोडणार्‍या रेषेत मात्र सूर्यापासून उलट्या दिशेने, दूर फेकले जातात. या शेपटीत कार्बन मोनोक्साइडच्या कणांचं प्रमाण जास्त असतं. हा वायू सूर्याकडून येणारी अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणं शोषतो. आणि नंतर निळ्या दृश्य प्रकाशाचं उत्सर्जन करतो. त्यामुळे ही शेपटी निळी दिसते.

बाहेर पडणार्‍या पदार्थांत सिलिकेट्स, लोह, ग्रॅफाइट आणि काही अमिनो आम्लं यांचा समावेश असतो. या पदार्थांवर कोणताही विद्युतप्रभार नसल्यामुळे सूर्याचं चुंबकीय क्षेत्र या पदार्थांवर प्रभाव टाकू शकत नाही. या कणांचा आकारही तुलनेने मोठा असल्याने सूर्याकडून येणार्‍या किरणांचा, या कणांवर तुलनेने जास्त दाब पडतो. या दाबामुळेच या शेपटीचा आकार धुमकेतूच्या फिरण्याच्या कक्षेच्या दिशेने थोडा वक्र होतो. हे कण सूर्याकडून येणारा प्रकाश परावर्तित करतात, म्हणून ही शेपटी फिकट पिवळसर किंवा पांढरी दिसते. गाभ्यातून बाहेर पडणारे हे पदार्थ धूमकेतूच्या कक्षेलगत साठत जातात. असे साठत गेलेले हे पदार्थ, दर वर्षी होणार्‍या उल्कावर्षावाचं कारण ठरतात.

– सुमेध सावंत

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : : http://www.mavipa.org