– रश्मी सहस्रबुद्धे
घाईगडबडीत दूध उतू जाणं, ही प्रत्येकाने अनुभवलेली गोष्ट आहे. गॅसवर दूध आणि चहाचं आधण ठेवलं की चहाचं पाणी खळाखळा उकळू लागतं. पण वेळेवर गॅस बंद केला नाही तर दूध मात्र शेगडीवर आणि नंतर खाली ओट्यावरसुद्धा सैरावैरा धावू लागतं. दुधालाच भांड्याबाहेर पडण्याची इतकी घाई का?
कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली असता तो प्रसरण पावतो म्हणजे त्याचं आकारमान वाढतं. द्रव पदार्थांना उष्णता दिली की एका विशिष्ट तापमानाला ते उकळतात. पण दुधात असं काय आहे की त्याचं प्रसरण असं अनियंत्रित व्हावं?
पाण्यासारखे इतर द्रव पदार्थ तापवायला ठेवले की सुरुवातीला तळाजवळ काही बुडबुडे दिसतात. ते पृष्ठभागाकडे जाताना मोठे होत जातात आणि नंतर फुटतात. त्यातून वाफ बाहेर पडते म्हणजेच हे बुडबुडे पाण्यात असलेल्या हवेने आणि पाण्याच्या वाफेने तयार होतात असं आपण म्हणू शकतो. परंतु दूध तापवताना असे बुडबुडे फारच कमी दिसतात, त्याआधी दुधावर एक पातळ पापुद्रा तयार होताना दिसतो. कारण दूध म्हणजे ८७ टक्के पाणी अणि काही प्रथिनं, केसिन, व्हे प्रोटिन, स्निग्ध पदार्थ, दुग्धशर्करा तसंच काही खनिजं यांचं जटिल मिश्रण आहे. गरम दुधावर तयार होणारा पापुद्रा म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं यांची दुधाच्या पृष्ठभागावर जमा होण्याची सुरुवात असते. हा थर जसजसा दाट होतो तसतसा तो आतल्या दुधासाठी संरक्षक थर बनतो. दुधातल्या पाण्याची वाफ तर होत असतेच. ती बाहेर पडण्यासाठी जेव्हा पृष्ठभागाकडे सरकते, तेव्हा हा संरक्षक थर त्या वाफेला अटकाव करतो. वाफेमध्ये असलेल्या शक्तीमुळे हा थर वरवर ढकलला जातो. जसजसं वाफेचं प्रमाण वाढत जातं, तसतसं आतून वाढत जाणार्या दाबाने दूध वेगाने वर ढकललं जातं. १०० अंश सेल्सियसच्या आसपास सर्व पाण्याची वाफ तयार होऊन ती या संरक्षक थराला पूर्ण शक्तीनिशी वर ढकलते आणि दूध भांड्याच्या बाहेर उतू जातं.
हा संरक्षक थर म्हणजेच आपल्या भाषेत दुधावर जमा होणारी साय! दूध उतू गेल्यावर त्यावरील सायीचा थरही मोडतो. लोणी काढण्यासाठी सायीला जपावं लागतं. म्हणून दूध तापवताना त्यावरचा सायीचा पूर्ण थर जमा होईपर्यंतच तापवावं. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचं संरक्षण होतं. दूध आटवायचं असल्यास त्यात सतत चमचा फिरवत रहावा किंवा पाण्याचा हबका मारावा, पातेल्यावर धातूचा डाव आडवा ठेवावा, अशा काही सोप्या गोष्टींमुळे आपण पाण्याच्या वाफेला अलगद बाहेर निघून जायला जागा करून देतो, परिणामी दूध उतू जात नाही!
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
