scorecardresearch

कुतूहल : जेन गुडाल

जेन गुडाल या विश्वविख्यात मानववंशशास्त्रज्ञ, जंगलात राहणाऱ्या चिंपांझीवर जवळपास ६० वर्षे संशोधन करत होत्या.

जेन गुडाल या विश्वविख्यात मानववंशशास्त्रज्ञ, जंगलात राहणाऱ्या चिंपांझीवर जवळपास ६० वर्षे संशोधन करत होत्या. चिंपांझीचे सामाजिक आयुष्य आणि त्यांचे कौटुंबिक संबंध कसे असतात याचा शोध घेण्यासाठी १९६० मध्ये टांझानियातील ‘गॉम्बे स्ट्रीम’ या राष्ट्रीय उद्यानात आपल्या आईसोबत त्या गेल्या आणि चिंपांझीची माणसाप्रमाणे असणारी वर्तणूक बघून पुढील कित्येक वर्षे त्याचा अभ्यास करण्यासाठी त्या तिथेच राहिल्या. त्यांच्या आईने त्यांना या करिअरमध्ये भरघोस साहाय्य केले असे त्या नमूद करतात. त्यांच्या या चिंपांझीप्रेमाचा जन्म अगदी लहान असल्यापासूनच झाला. ‘ज्युबिली’ नावाचे त्यांचे चिंपांझीचे ‘सॉफ्ट टॉय’ बाहुले त्यांचे प्रेरणास्रोत ठरले. अजूनही ही ज्युबिली त्यांच्या अभ्यासाच्या डेस्कवर विराजमान आहे. ‘मेरी लिकी’ या विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञ महिलेने जेन यांची ओळख हेल आणि जॉन नेपियर या शास्त्रज्ञांशी करून दिली.

केंब्रिज विद्यापीठातून प्राण्यांच्या वर्तणूकशास्त्रात पीएच.डी. मिळवल्यानंर त्यांनी चिंपांझीचे वागणे-बोलणे समजून घेण्यासाठी पाच वर्षे राष्ट्रीय उद्यानातच राहणे पसंत केले. साधारण शास्त्रज्ञांप्रमाणे चिंपांझीना क्रमांक न देता त्यांनी यांना नावे दिली. प्रत्येक चिंपांझीचे स्वत:चे असे वैयक्तिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनादेखील माणसाप्रमाणेच आनंद व दु:ख होते आणि मिठय़ा मारणे, चुंबन घेणे, पाठीवर थोपटणे, गुदगुल्या करणे अशा मानवी क्रियादेखील हे चिंपांझी करत असतात. अशा प्रेमळ क्रियांनी ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवतात. भावना, बुद्धी, कौटुंबिक आणि सामाजिक नाती अशासारख्या अनेक बाबींचा उलगडा अभ्यास करत असताना जेन यांना झाला. कधी कधी प्रेमळ भासणारे हे चिंपांझी छोटय़ा माकडांची शिकारदेखील करतात. त्याचप्रमाणे टोळीमध्ये स्वत:चे वर्चस्व ठेवण्यासाठी ते छोटय़ा चिंपांझीना मारून त्यांचे भक्षणही करतात, ही बाब जेन यांनी पाहिली. मानवाप्रमाणेच दुष्टपणादेखील चिंपांझी करू शकतात, याचा साक्षात्कार जेनना झाला. १९७७ मध्ये ‘जेन गुडाल इन्स्टिटय़ूट’ची स्थापना करून त्यांनी या प्राण्यांच्या कल्याणाकरिता विविध संरक्षण आणि संवर्धन योजना राबवल्या. या विषयातील संशोधनाला खूप मोठे साहाय्य मिळत गेले. आज जगभरात या संस्थेची १९ कार्यालये असून त्यांनी १९९१ मध्ये ‘रुट्स अ‍ॅण्ड शूट्स’ या शीर्षकाखाली युवकांसाठी जागतिक पातळीवरचे संशोधन कार्यक्रम सुरू केले आहेत.

२००२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची शांततादूत म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. याशिवाय अनेक पुरस्कार पर्यावरणीय आणि मानवतावादी कार्य केल्याबद्दल मिळालेले आहेत. जगभरातल्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये ‘टाइम्स’ मासिकाने त्यांचा २०१९ मध्ये  समावेश केलेला आहे. निसर्गासमोर नतमस्तक होऊन संशोधन करणाऱ्या या स्त्रीचा असा सन्मान यथोचित आहे.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ: http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal world famous anthropologist social life family relationships behavior ysh

ताज्या बातम्या