कुतूहल: जागतिक मत्स्यव्यवसाय दिन | Kutuhal World Fisheries Day Scientific research of fisheries amy 95 | Loksatta

कुतूहल: जागतिक मत्स्यव्यवसाय दिन

मासेमारी ही तीन प्रकारची असते. भर समुद्रातील, किनाऱ्यालगत केली जाणारी तसेच सर्व नद्या, तलाव यासारख्या जमिनीवरच्या जलसाठय़ातील मत्स्यसंपदा पकडणे.

कुतूहल: जागतिक मत्स्यव्यवसाय दिन

मासेमारी ही तीन प्रकारची असते. भर समुद्रातील, किनाऱ्यालगत केली जाणारी तसेच सर्व नद्या, तलाव यासारख्या जमिनीवरच्या जलसाठय़ातील मत्स्यसंपदा पकडणे. मासेमारीच्या शास्त्रीय संशोधन अभ्यासासाठी केंद्र सरकारने दोन वेगवेगळय़ा संस्था देखील स्थापलेल्या आहेत. सागरी आणि गोडय़ा पाण्यातील मासेमारी तसेच मत्स्यशेती या सर्वाच्या एकत्रित उत्पादनावर जगातील ८२ कोटी लोक अवलंबून आहेत. त्यांच्याकडून मासेमारी, त्यांचा व्यापार आणि विक्री इत्यादी बाबी सांभाळल्या जातात. मासेमारी ही त्या वर्गाची सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळख आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात, हवामान बदल, अशाश्वत पद्धतीने करण्यात येणारी मासेमारी, जलाशयांचे प्रदूषण अशा अनेक कारणांनी मत्स्यव्यवसाय धोक्यात आला आहे. तीन बाजूने समुद्राने वेढलेल्या भारताचे मासेमारीचे स्थान जगाच्या नकाशावर आठवे आहे आणि त्यापासून आपल्याला १४२ लाख टन मत्स्योत्पादन मिळत असते (२०१९-२० चे उत्पादन). मत्स्यसंपदेच्या निर्यातीपासून भारत ४६,६६२ कोटी रुपये मिळवतो आणि ही संख्या कृषीउत्पादनाच्या १८ टक्के आहे. २०२४-२५ पर्यंत हे उत्पादन २.२ कोटी टन इतके वाढवायची मनीषा आहे. याशिवाय मत्स्यशेती देखील खूप मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय मिळवून देत आहे.

या सर्व कारणांसाठी जगभरात मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांकडून दरवर्षी २१ नोव्हेंबर हा ‘जागतिक मत्स्यव्यवसाय दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिन साजरा करून सागरी परिसंस्था आरोग्यपूर्ण असावी आणि समुद्रात असणाऱ्या मत्स्य साठय़ांचा शाश्वत वापर व्हावा, यासाठी जनजागरण केले जाते.
२१ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रथमच जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा करण्यात आला. त्याच दिवशी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय मच्छिमार संस्थेची स्थापना झाली. त्याआधी १९९७मध्ये ‘वल्र्ड फिशरीज कन्सॉरशियम’ प्रस्थापित करण्यात आला होता. याअंतर्गत जगभरात बरेच सभासद क्रियाशील सहभाग घेत असत. यामध्ये १८ देशांनी आपापल्या प्रदेशात मासेमारीच्या पद्धतीत नियमितता आणण्यासाठी दस्तऐवज तयार केले होते. भारतामध्ये या दिवशी मत्स्य व्यवसाय, पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या सहभागाने पारितोषिक समारंभ होतो. अशा प्रकारचे दिन साजरे करून जगभरातल्या मच्छीमार समाजांचा एकोपा वाढीस लावणे, तसेच मत्स्यशेती करणाऱ्या व्यावसायिकांना साहाय्य आणि यंत्रणेला मदत देणे अशी उद्दिष्टय़े सफल होतात.
या दिनाच्या निमित्ताने अतिरिक्त प्रमाणात आणि अशाश्वत पद्धतीत चालणारी (उदा. पर्ससीन नेट) मासेमारी, माशांच्या अधिवासाची हानी, सागरी तसेच जमिनीवरचे साधनसंपदेचे नुकसान आणि इतर गंभीर स्वरूपाचे धोके निर्माण होऊ नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात.
डॉ. नंदिनी वि. देशमुख,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2022 at 00:57 IST
Next Story
कुतूहल : पक्ष्यांचा अभ्यासपूर्ण मागोवा..