जगभर सर्वत्र आढळणारे पाणमांजर जलीय परिसंस्थेतील महत्त्वाचा दुवा आहे. ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिक वगळता सर्व नद्या, तळी, दलदल, खाडय़ा आणि महासागरांमध्ये पाणमांजराच्या विविध प्रजाती आढळतात. मासे, कालवे, खेकडे, सी-अर्चिन यांसारख्या छोटय़ा जलचरांची शिकार करणारे हे भक्षक असंख्य अन्नसाखळय़ा नियंत्रित करतात. पाणमांजरांची संख्या खालावली तर त्यांचे खाद्य असलेल्या सी-अर्चिनची संख्या बेसुमार वाढते. परिणामी समुद्री गवत आणि वनस्पतीचा ऱ्हास होऊ लागतो व त्यामध्ये राहणाऱ्या सजीवांच्या प्रजाती संकटात सापडतात. समुद्री गवत सुरक्षित ठेवून पाणमांजरे अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जनही कमी करतात. परंतु मागील काही दशकांमध्ये पाणमांजरांची संख्या कमालीची खालावली आहे. पाणमांजरांची त्यांच्या घनदाट व मऊसूत फरसाठी केली जाणारी शिकार यासाठी कारणीभूत आहे. याशिवाय बांधकामासाठी घातलेले भराव, जलपर्यटन आणि प्रदूषणामुळे पाणमांजरांचे अधिवास नष्ट होत आहेत. समुद्रात सोडली जाणारी विषारी रसायने आणि तेलगळतीमुळे दरवर्षी हजारो पाणमांजरे मृत्युमुखी पडतात. आजघडीला पाणमांजरांच्या १३ प्रजातींपैकी एका प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आहे; तर चार प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचल्या आहेत. सागरी अधिवास सुरक्षित ठेवायचे असतील तर पाणमांजरांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे हे समजून १९९३ मध्ये इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पाणमांजर बचाव निधी (इंटरनॅशनल ऑटर सव्र्हायव्हल फंड) या संस्थेची स्थापना झाली. त्यातूनच पाणमांजराचे जतन आणि संवर्धन यासाठी जागतिक पाणमांजर दिवसाची सुरुवात झाली.२०१४ पासून जगभर २० देशांमध्ये मे महिन्याचा शेवटचा बुधवार जागतिक पाणमांजर दिवस म्हणून साजरा केला जातो. पाणमांजरांचे महत्त्व आणि त्यांना असलेले धोके सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्या संवर्धनात सर्वाना सामील करून घेणे ही यामागील दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. या दिवशी जगभरात अनेक उपक्रम राबवले जातात. पाणमांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्राणिसंग्रहालये, संवर्धन संस्थांमध्ये पर्यावरण अभ्यासकांची व्याख्याने, कार्यशाळा व परिसंवाद आयोजित केले जातात. पाणमांजरांचे अधिवास वाचवण्यासाठी व जलप्रदूषण कमी करण्याबद्दल नागरिकांना जागरूक केले जाते. २०२३ मध्ये ३१ मे रोजी जागतिक पाणमांजर दिवस साजरा केला जात आहे. परिसंस्थांचे राखणदार असलेल्या पाणमांजरांच्या संरक्षणात आपण काय हातभार लावू शकतो याबद्दलही गांभीर्याने विचार करू या.- अदिती जोगळेकर ,मराठी विज्ञान परिषद