अदिती जोगळेकर
व्हेल म्हणजेच देवमासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव आहे. ७५ पेक्षा अधिक प्रजाती अस्तित्वात असलेला हा समुद्री सस्तन प्राणी! तो मत्स्यवर्गीय नसल्याने त्याला आता देवमासा म्हणत नाहीत. जगभरातील दर्यावर्दीच्या साहसकथांमध्येही राक्षसी व्हेलशी झुंजींचे उल्लेख आढळतात. सागरी परिसंस्थांचे संतुलन राखण्यामध्ये व्हेल प्रजातींचा महत्त्वाचा वाटा असतो. जगभरातील सर्व महासागरांमध्ये व्हेल आढळतात कारण पुनरुत्पादन व खाद्यासाठी व्हेल आक्र्टिक समुद्रापासून उष्णकटिबंधीय समुद्रापर्यंत सर्वत्र भ्रमंती करतात. डेन्मार्क, नॉर्वे इत्यादी स्कॅन्डेव्हिअन देशांच्या किनाऱ्यांवर व्हेल निरीक्षणासाठी विशेष सहलीदेखील आयोजित केल्या जातात.
ख्रिस्तपूर्व २००० पासून कातडे, तेल आणि चरबीसाठी व्हेलची मोठय़ा प्रमाणात शिकार केली गेली. याचा परिणाम म्हणून २०व्या शतकापर्यंत ब्लू व्हेल, ग्रे व्हेल, स्पर्म व्हेल व सेई व्हेल यांसह अन्य अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले तर काही प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर पोहोचल्या. याशिवाय सागरी प्रदूषण, विषारी रसायने, तेलगळती यामुळे व्हेलचे अधिवास धोक्यात येऊन त्यांची संख्या अधिकच रोडावली. १९४०च्या दशकात व्हेलचे जतन व संवर्धन करणे अत्यावश्यक आहे हे सागरी वैज्ञानिकांच्या निदर्शनास आले व त्यासाठी अनेक संस्थांची निर्मिती झाली.
१९८० मध्ये हवाई बेटांवरील माऊई येथे सर्वात पहिला जागतिक व्हेल दिवस ग्रेग कौफमन या व्हेल अभ्यासकाच्या कल्पनेवरून साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील तिसरा रविवार ‘जागतिक व्हेल दिन’ म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीला हम्पबॅक व्हेल प्रजातीबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने माऊई व्हेल उत्सवाचे आयोजन केले जात असे. मिरवणुका, चित्ररथ, नाटय़मय सादरीकरण यांद्वारे व्हेल-संवर्धनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले जाई. आता त्याचे स्वरूप व्यापक झाल्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. व्हेलच्या विविध प्रजातींच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्राणिसंग्रहालये, शैक्षणिक संस्था व संवर्धन संस्था यामध्ये भाग घेतात. व्याख्याने, कार्यशाळा व परिसंवाद आयोजित केले जातात. व्हेल अभ्यासक व पर्यावरणवादी या उपक्रमांच्या माध्यमातून व्हेल-संवर्धनाचे गांभीर्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता संवाद साधतात. व्हेलसाठी घातक असलेला प्लास्टिक कचरा आणि सागरी प्रदूषण कमी करण्यासाठी सामान्य नागरिकांना जागरूक केले जाते. तसेच व्हेलची चित्रे असलेल्या स्मृतिचिन्हांची आणि भेटवस्तूंची विक्री केली जाते. २०२३ मध्ये १९ फेब्रुवारी रोजी जागतिक व्हेल दिवस साजरा करताना आपण सर्वानीच व्हेल संवर्धन अधिक जबाबदारीने जाणून घेऊ या.