हास्य अतिशय मनमोहक असतं. मात्र आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा हसण्याला खूप महत्त्व आहे.आपण हसतो तेव्हा शरीरातले अनेक अवयव उत्तेजित होतात. शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं. आधी हृदयगती वाढते, रक्तदाब वाढतो आणि नंतर हे दोन्ही नेहमीपेक्षादेखील कमी होतात. म्हणूनच हृदयाच्या आरोग्यासाठी हसणं उपयुक्त आहे. हसताना दीर्घ श्वास घेतल्यामुळे, फुप्फुसं शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सिजनयुक्त हवा घेतात. खळखळून हसण्याने छाती, पोट, खांदे आणि चेहर्याच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.

हसल्यामुळे मेंदूमध्ये ‘एन्डॉर्फिन’ नावाचं संप्रेरक तयार होतं. एन्डॉर्फिन्स संदेशवाहक असतात. आपल्याला जिथे वेदना जाणवते तिथे पोहोचून एन्डॉर्फिन्स तिथली वेदना कमी करतात. म्हणूनच एन्डॉर्फिन्स शरीराची  नैसर्गिक वेदनाशामक यंत्रणा आहे असं म्हटलं जातं. ती कार्यान्वित होण्यासाठी हसणं हा एक चांगला उपाय आहे. हसण्यामुळे आपलं लक्ष वेदनेपासून दूर जातं, ताण कमी होतो, आनंदी वाटतं आणि ताण हलका झाल्यामुळे स्नायूदेखील शिथिल होतात. त्यामुळे हसण्याने आपली वेदना सहन करण्याची शक्ती वाढते.

नैराश्य, भीती, चिंता, ताण आणि राग अशा नकारात्मक भावनांमुळे आपल्यावर केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक परिणामदेखील होऊ शकतात. आपला मेंदू, पियुषिका ग्रंथी आणि मूत्रपिंडाजवळच्या अधिवृक्क ग्रंथी यांच्यामार्फत शरीरात ‘कॉर्टिसॉल’ आणि ‘एपिनेफ्रिन’ संप्रेरकांची निर्मिती होते. त्यामुळे शरीरासाठी हानीकारक सूज वाढून कितीतरी जुनाट, दीर्घकालीन आजारांची सुरुवात होऊ शकते. ही संप्रेरकं वाढल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते. दीर्घकाळ कॉर्टिसॉल वाढल्यामुळे झोप न येणे, वजन वाढणे असेही त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ एपिनेफ्रिन वाढल्यामुळे हृदयगती वाढणे, रक्तदाब वाढणे, सतत जागृतावस्था राहणे, ताणाची स्थिती राहणे यासारखे त्रास होतात. म्हणजेच शरीराची विश्रांती कमी होते.

याउलट हसण्यामुळे शरीरासाठी त्रासदायक कॉर्टिसॉल आणि एपिनेफ्रिनचं प्रमाण कमी होतं. आपल्याला शांत आणि तणावरहित वाटतं. सकारात्मकता निर्माण होते. हसण्यामुळे मेंदूतून ‘डोपामिन’ आणि ‘सेरोटोनिन’ नावाच्या संप्रेरकांची निर्मिती होते. त्यामुळे मन उल्हसित आणि प्रसन्न होतं. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असली तरी, तिला तोंड देण्याचा आत्मविश्वास आपल्याला हसण्यामुळे मिळू शकतो.

हसणं आपल्या शरीरात कोंडून राहिलेल्या ज्ञात आणि अज्ञात भावनिक, मानसिक व शारीरिक ताणांना मोकळी वाट करून देण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच हसणं हे सर्वोत्तम औषध आहे, असं म्हटलं जातं. तेव्हा हसण्यासाठी कुठल्याही प्रसंगाची वाट न बघता अगदी वर्तमानपत्रातील विसंगतीवर बोट ठेवणार्या व्यंगचित्राकडे बघूनदेखील आपण मनमोकळं हसावं आणि ताण हलका करावा!- डॉ. राजेश पुसाळकर ,मराठी विज्ञान परिषद