कुतूहल : रेशमी कोळीष्टक

कोळय़ाचे रेशीम मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार केलेल्या प्रथिनांपासून रेशमाचे तंतू तयार करणे.

silkworm
(संग्रहित छायाचित्र)

मृदू मुलायम रेशीम म्हणजे वस्त्रांचा राजा. त्यातही अतिउत्तम म्हणजे कोळय़ांनी बनविलेला रेशीम धागा. लोखंड किंवा केवलारपेक्षाही मजबूत, अतिशय हलके व लवचीक, न भिजणारे, बुरशी किंवा कुठल्याही सूक्ष्म जिवाणूंचा परिणाम न होणारे, नैसर्गिकरीत्या विघटन होणारे असे हे कोळय़ाचे रेशीम, शास्त्रज्ञांचे लक्ष न वेधते तरच नवल.

कोळी आपल्या पोटातील रेशीमग्रंथींचा उपयोग करून द्रवरूप चिकट रेशीम-प्रथिने निर्माण करतात. पोटाच्या मागच्या बाजूस असलेल्या तनित्रांच्या (spinnerets) साहाय्याने या चिकट प्रथिनांपासून तार खेचत धागा तयार करतात. वेगवेगळय़ा जातींचे कोळी गरजेनुसार वेगवेगळय़ा गुणधर्माचे रेशीम तयार करतात. एक कोळी साधारण सात प्रकारचे धागे/ तंतू तयार करतो. त्यांचा उपयोग जाळे विणणे, स्वत:ला उलटे टांगणे, भक्ष्य पकडणे, प्रणयाराधन इत्यादीसाठी होतो.

कोळय़ाचे हे बहुगुणी रेशीम तयार करण्यासाठी गेली काही शतके प्रयत्न सुरू आहेत. आता त्यात यश येताना दिसते. कोळय़ांची पैदास करून त्यांच्यापासून रेशीम काढणे हा एक मार्ग आहे. परंतु हे काम अत्यंत जिकिरीचे आहे. जनुक अभियांत्रिकीद्वारे रेशीम तयार करण्याच्या अशा प्रयत्नांविषयी आपण या सदरातील १८ जानेवारीच्या ‘रेशीम’ या लेखात वाचले आहे. कोळय़ाचे रेशीम मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार केलेल्या प्रथिनांपासून रेशमाचे तंतू तयार करणे. कोळय़ाचे रेशीम लांबलचक प्रथिन-रेणूंच्या साखळीने तयार झालेले असते. रेशीम-प्रथिनांचा क्रम अमायनो आम्लांसारखा असतो. या रेणूंच्या स्फटिकी रचनेचा (क्रिस्टल स्ट्रक्चर) भाग ऑलनाइन, तर विस्कळीत (अमोर्फस) भाग ग्लायसिनने तयार झालेला असतो. पॉलीरॉलिडाईड या सेंद्रिय-संयुगामुळे हा धागा मृदू राहतो, तर हायड्रोजन फॉस्फेटमुळे याला बुरशी लागत नाही किंवा सूक्ष्म जिवाणूंचा त्यावर परिणाम होत नाही.

केम्ब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत ९८ टक्के पाणी आणि दोन टक्के सिलिका व सेल्युलोज अशा हायड्रोजेल मिश्रणापासून तंतू खेचून रेशीम तयार केले आहे. ३० सेकंदांत त्यातील पाण्याचा अंश निघून जाऊन तयार झालेल्या धाग्यात  कोळय़ाच्या रेशमासारखेच गुणधर्म आहेत. ही प्रक्रिया सर्वसाधारण तापमानाला आणि कुठल्याही रासायनिक द्रावकाच्या वापराशिवाय केली जाते. यासाठी लागणारे पदार्थ सहज आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे हे रेशीम सर्वसामान्यांना परवडू शकेल. याचा उपयोग मोटारीचे किंवा विमानाचे भाग, हवाई छत्री, मजबूत  कापड तसेच अस्थिबंध, स्नायुबंध संबंधित शस्त्रक्रियांमध्ये बँडेज इत्यादीसाठी करता येईल.

– डॉ. सुभगा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Life cycle of silkworm physica structure of silkworm zws

Next Story
भाषासूत्र : शिजलं, भिजलं, वाया गेलं.. बेलनं फिरून कामा आलं!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी