‘प्रकाशवर्ष’ हा शब्द वाचून अनेकांना ‘वर्ष’ या कालमापनाच्या एककाप्रमाणेच हेही वेळ मोजण्याचेच एकक असावे, असे वाटू शकते. पण प्रत्यक्षात तसे नसून ‘प्रकाशवर्ष’ हे मोठी अंतरे मोजण्यासाठीचे एकक आहे. खगोलीय वस्तूंतील अंतर प्रचंड असल्याने ते किलोमीटर, मैल अशा एककांत मोजणे कठीण जाते. म्हणून प्रकाश सर्वांत वेगवान असल्याने अवकाशातील प्रचंड अंतरे मोजण्यासाठी प्रकाशाने पार केलेल्या अंतराचा वापर होऊ लागला. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने ‘प्रकाशाने निर्वात जागेतून प्रवास करताना एका ज्युलियन वर्षांत पार केलेले अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष’ अशी व्याख्या केली आहे. साधारणपणे हे एकक दोन ताऱ्यांमधील किंवा दीर्घिकांमधील अंतरे मोजण्यासाठी वापरतात.

प्रकाशवर्ष या संकल्पनेचा प्रथम उल्लेख फ्रेड्रिक बेसेल यांनी १८३८मध्ये केला. त्यांनी खगोलशास्त्रीय एकक (अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनिट) वापरून ‘६१ सिग्नी’ या जुळ्या ताऱ्यांचे अंतर मोजले, पण वाचकांना कल्पना करणे अधिक सोपे आणि रंजक व्हावे यासाठी वर्णन करताना प्रकाशाला हे अंतर पार करायला १०.३ वर्षे लागतील असे म्हटले. परंतु तेव्हा प्रकाशाचा वेग अचूकपणे मोजून त्याची स्थिरांक म्हणून नोंद झाली नव्हती. मात्र आता एक ज्युलियन वर्ष = ३६५.२५ दिवस = (३६५.२५ गुणिले २४ गुणिले ६० गुणिले ६०) सेकंद = ३,१५,५७,६०० सेकंद आणि प्रकाशाचा वेग २९,९७,९२,४५८ मीटर/सेकंद मानला जातो. त्यामुळे एक प्रकाशवर्ष हे (३,१५,५७,६०० सेकंद) गुणिले (२९,९७,९२,४५८ मीटर/सेकंद) म्हणजेच सुमारे (९.४६०७) गुणिले १०चा बारावा घात किलोमीटर एवढे असते. खगोलशास्त्रज्ञ अवकाशीय अंतरे मोजण्यासाठी पार्सेक हे आणखी एक मोठे एकक वापरतात. १ पार्सेक = ३.२६ प्रकाशवर्षे. लोकप्रिय विज्ञानसाहित्यात मात्र प्रकाशवर्ष याच एककाचा उल्लेख प्राधान्याने दिसतो.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
vasai virar municipal corporation marathi news, vasai virar property tax marathi news
वसई: पालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट अपूर्ण, यंदाच्या वर्षी ३३८ कोटींची मालमत्ता कर वसुली

प्रकाशवर्ष याच संकल्पनेच्या विस्ताराने प्रकाशसेकंद, प्रकाशमिनिटे यांसारख्या संकल्पना उदयास आल्या. उदाहरणार्थ, प्रकाशसेकंद म्हणजे प्रकाशाने निर्वात जागेत एका सेकंदात पार केलेले अंतर. सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित झाल्यावर पृथ्वीवर पोहोचायला सुमारे १.२ ते १.३ सेकंद लागतात. म्हणून चंद्र आणि पृथ्वीतील अंतर १.२ ते १.३ प्रकाशसेकंद आहे. तसेच सूर्यप्रकाश थेट पृथ्वीवर पोहोचायला सुमारे ८.३२ मिनिटे लागतात. म्हणून सूर्य आणि पृथ्वीतील अंतर (एक खगोलशास्त्रीय एकक) ८.३२ प्रकाशमिनिटे आहे. आपल्या सूर्याच्या सर्वांत जवळच्या ज्ञात ताऱ्याचे म्हणजेच एका नरतुरंगियाचे (प्रॉक्झिमा सेण्टॉरी) सूर्यापासूनचे अंतर साधारण ४.२५ प्रकाशवर्ष आहे. आपल्या आकाशगंगेचा विस्तार सुमारे १,५०,००० प्रकाशवर्ष आहे. तसेच देवयानी तारकासमूहातील ‘एम ३१’ दीर्घिकेचे आपल्यापासूनचे अंतर सुमारे २५ लाख प्रकाशवर्ष असल्याने आपण सध्या ही २५ लाख वर्षांंपूर्वीची दीर्घिका पाहतो!

– मुग्धा महेश पोखरणकर

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org