कुतूहल : गहन ग्रहणचक्र

ग्रहणासाठीच्या दुसऱ्या आवश्यकतेनुसार, हे दोन्ही मार्ग एकमेकांना जिथे छेदतात तिथे सूर्य व चंद्र असायला हवेत

सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो आणि त्याची सावली पृथ्वीवर पडते. तसेच चंद्रग्रहणात सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी येते आणि तिची सावली चंद्रावर पडते. ग्रहण घडून येण्यासाठी हे तीनही गोलक (जवळपास) एका रेषेत येणे आवश्यक असते. हे फक्त अमावास्येला वा पौर्णिमेलाच घडू शकते. त्यामुळे दोन सूर्यग्रहणांतला वा दोन चंद्रग्रहणांतला काळ हा किमान एका चांद्रमासाइतका म्हणजे सुमारे २९.५ दिवसांचा असायला हवा. सूर्य आणि चंद्र यांचे, आकाशाच्या पार्श्वभूमीवरचे मार्ग एकमेकांशी सुमारे पाच अंशांनी कललेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण अमावास्येला चंद्राची सावली पृथ्वीच्या बाजूने निघून जाते. परिणामी, सूर्यग्रहण घडू शकत नाही. तसेच सर्वसाधारण पौर्णिमेला पृथ्वीची सावली चंद्रग्रहण न लावता चंद्राच्या बाजूने निघून जाते.

त्यामुळे ग्रहण लागण्यासाठी फक्त अमावास्या वा पौर्णिमा असून चालत नाही. ग्रहणासाठीच्या दुसऱ्या आवश्यकतेनुसार, हे दोन्ही मार्ग एकमेकांना जिथे छेदतात तिथे सूर्य व चंद्र असायला हवेत. या छेदनबिंदूंना राहू आणि केतू म्हटले जाते. चंद्राच्या राहूपासून राहूपर्यंतच्या किंवा केतूपासून केतूपर्यंतच्या प्रवासाला २७.२ दिवस लागतात. ग्रहणाचे स्वरूप व कालावधी हा आणखी तिसऱ्या गोष्टीवरही अवलंबून असतो. ती म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातले अंतर. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने, चंद्राच्या पृथ्वीपासूनच्या अंतरात सतत फरक पडत असतो. त्यामुळे चंद्राच्या पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या चंद्रावरील सावल्यांचे आकारही लहान-मोठे होत असतात. ग्रहणाची शक्यता वर्तवण्यासाठी हे अंतरही लक्षात घ्यावे लागते. चंद्र हा पृथ्वीपासून सर्वात जवळच्या बिंदूवर, म्हणजे उपभूस्थानी, २७.६ दिवसांनी परततो.

या तीनही कालावधींवर आधारलेल्या गणितानुसार, दर २२३ चांद्रमासांनी म्हणजे ढोबळमानाने १८ वर्षे, ११ दिवस आणि आठ तासांनी ग्रहणांच्या स्वरूपाची पुनरावृत्ती होत असते. याला ‘ग्रहणचक्र’ म्हटले जाते. ग्रहणचक्रातील अतिरिक्त आठ तासांमुळे, प्रत्येक ठिकाणी नव्या ग्रहणचक्राची सुरुवात आठ तास उशिरा होत जाते. तीन ग्रहणचक्रांनंतरच्या ग्रहणचक्राची सुरुवात मात्र, प्रत्येक ठिकाणी एक दिवस उशिरा, परंतु पुन्हा त्याच वेळी होते. या ग्रहणचक्रांवरून जरी ग्रहणांचा अंदाज वर्तवता येत असला तरी, एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून ग्रहण बरोबर कोणत्या वेळी व कसे दिसेल, हे कळण्यासाठी मात्र तपशीलवार गणिते करावी लागतात. ही गणिते पृथ्वीच्या व चंद्राच्या सावल्यांच्या भूमितीवर आधारलेली आहेत. जर्मनीच्या फ्रिडरिश  बेसेल यांनी सूर्यग्रहणांच्या बाबतीत इ.स. १८२०च्या दशकात सुचवलेली, पृथ्वीवर पडणाऱ्या चंद्राच्या सावलीवर आधारलेली पद्धत आजही वापरात आहे. चंद्रग्रहणासाठीही काहीशी अशीच पद्धत वापरली जाते. फरक इतकाच की, चंद्रग्रहणाच्या बाबतीत चंद्रावर पडणारी पृथ्वीची सावली लक्षात घेतली जाते.

डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org     

ईमेल : office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta kuthul solar eclipse zws