खगोलशास्त्र हे विज्ञानाच्या सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे. प्राचीन संस्कृतीच्या लोकांसाठी आकाश हे घड्याळ, होकायंत्र तसेच दिनदर्शिका किंवा पंचांग होते. विसाव्या शतकापर्यंत खगोलशास्त्रज्ञ रात्री जागून दुर्बिणींच्या आधारे आकाशाचे निरीक्षण करून नव्या गोष्टींची नोंद करायचे. सन १६०९ या वर्षी गॅलिलिओ गॅलिली यांनी स्वत: सुधारणा केलेली दुर्बीण सर्वप्रथम आकाशाकडे वळवली आणि नव्या दृष्टीने विश्वाकडे बघितले. चंद्रावरील विवरे आणि डोंगरदऱ्या, गुरूचे उपग्रह, शुक्राच्या कलांचा शोध गॅलिलिओ यांनी लावला. आकाशात जिथे साध्या डोळ्यांना अंधार दिसतो तिथे दुर्बिणीतून बघितल्यावर शेकडो छोटे अंधुक तारे दिसतात हे सर्वप्रथम गॅलिलिओ यांच्या लक्षात आले.
गॅलिलिओ यांच्या शोधाला आता चार शतकांहून अधिक कालखंड उलटून गेला आहे. आज माणसाने हबल, जेम्स वेब सारख्या ताकदवान दुर्बिणी अवकाशात सोडल्या आहेत आणि या अवकाशस्थित दुर्बिणी अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या तारकाविश्वांचा वेध घेत आहेत. २०२२ साली जेम्स वेब या दुर्बिणीने काढलेले ‘डीप फील्ड’ छायाचित्र शास्त्रज्ञांनी प्रसृत केले. एखादा वाळूचा कण जर चिमटीत पकडून हातभर अंतरावर धरला तर तो जितकी सूक्ष्म जागा व्यापेल तितक्या जागेच्या आकाशात लक्ष केंद्रित करून जेम्स वेब दुर्बिणीने हे छायाचित्र काढले होते. या छायाचित्रात हजारो तारकाविश्वे दिसतात. आपले विश्व गॅलिलिओने स्वप्नातही विचार केला नसेल इतके प्रचंड मोठे आहे.
एकविसाव्या शतकातील ताकदवान दुर्बिणी इतक्या प्रचंड प्रमाणात नव्या तारकाविश्वांची, ग्रह-ताऱ्यांची माहिती गोळा करत आहेत की त्यांची नोंदणी करणे, या माहितीचं वर्गीकरण करणे जगभरातील शास्त्रज्ञांच्या क्षमतेबाहेरचे आहे. इथे कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ खूप मोलाची ठरत आहे.
न्यूरल नेटवर्क वापरणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रोग्रॅम्स दुर्बिणींनी काढलेल्या नव्या छायाचित्रांचा बारकाईने अभ्यास करतात. छायाचित्रात किती तारकाविश्वे आहेत, त्यांचा आकार कसा आहे, त्यांचे वर्गीकरण कसे करता येईल यावर काम करतात. हे प्रोग्रॅम्स ९८ टक्क्यांहून अधिक अचूकपणे माहितीचे विश्लेषण करण्यात तरबेज झाले आहेत. त्याशिवाय छायाचित्रांची गुणवत्ता वाढवण्यासाठी देखील कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते आहे. उदाहरणार्थ २०१९ साली ‘मेसियर ८७’ या तारकाविश्वातील प्रचंड कृष्णविवराचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. या छायाचित्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेने सुधारणा केल्या. मूळ छायाचित्राच्या दुप्पट चांगच्या प्रतीचे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने बनवले गेले. हे छायाचित्र कृष्णविवराच्या आकाराबद्दल सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानुसार केलेल्या अनुमानाशी हुबेहूब जुळून आले. खगोलशास्त्रातील नवी क्रांती सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने घडते आहे.