माणसाप्रमाणे दिसणाऱ्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या ह्यूमनॉइडचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारे परिणाम होताना दिसतो. पुढील काळात जागतिक तापमानवाढीमुळे किंवा वाढत्या प्रदूषणामुळे माणसांना जेव्हा अनेक कामे करणे अशक्य होईल, महामारी आणि आणीबाणीच्या काळात किंवा जिथे कुठे मानवी मनाला आणि शरीराला बंधन येईल तिथे या ह्यूमनॉइडची भरपूर मदत होऊ शकेल. भविष्यातील ह्यूमनॉइड हे मानवाला विविध धोक्यांपासून वाचवण्यास मदतदेखील करतील. यामध्ये घातक, आण्विक-प्रभावित क्षेत्रात काम करणे, धोकादायक रसायने/ वायूंचा सामना करणे, बॉम्ब व सुरुंग शोधणे, खाणकाम, फटाके बनवणे, वेल्डिंग आणि इतर अनेक धोकादायक कामांचा समावेश आहे. कदाचित भविष्यातील युद्धांमध्येदेखील या ह्यूमनॉइडचा वापर केला जाईल. ह्यूमनॉइड भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी, विशेषत: दूरच्या आणि धोकादायक वातावरणात फायदेशीर ठरू शकतात.
एका जरी ह्यूमनॉइडला भांडी घासणे, स्वयंपाक करणे यासारखी दैनंदिन कामे शिकवली गेली तर इतर सर्व ह्यूमनॉइडना हे कसब तात्काळ हस्तांतरित करता येईल. त्यामुळे मानवांसारखा प्रशिक्षणाचा वेळ ह्यूमनॉइडना लागणार नाही. कोणताही ह्यूमनॉइड एकदा शिकलेले कौशल्य विसरणार नाही. ते फक्त कालबाह्य झालेले ज्ञान आणि कौशल्य सोडून नवनवीन कौशल्यांत आपोआपच पारंगत होत जातील. ह्यूमनॉइड हे अथकपणे रात्रंदिवस काम करू शकत असल्यामुळे कामाची उत्पादनक्षमता, कार्यांमध्ये अचूकता आणि कुशलता वाढेल. हे सर्व फायदे असले तरी त्यांचे काही तोटेदेखील आपल्याला लक्षात घ्यायला हवेत.
ह्यूमनॉइड हे अधिक महाग असल्यामुळे सामान्यांना ते परवडणार नाहीत आणि त्यांचा वापर कदाचित फक्त श्रीमंत लोकांपुरताच मर्यादित असू शकेल. गाडी किंवा संगणकांप्रमाणेच, या ह्यूमनॉइडना सुरळीत काम करण्यासाठी वारंवार तपासणी आणि दुरुस्तीची आवश्यकता असते. विजेअभावी अचानक खंडित होणे किंवा योग्य कार्य न करणे या समस्यादेखील ह्युमनॉइडमध्ये उद्भवू शकतात. अचानक बंद पडलेल्या ह्यूमनॉइडमुळे अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांची देखभाल करणे खूप खर्चीक असेल. कितीही झाले तरी ते एक यंत्र असल्यामुळे त्याला मानवी भावना कितपत समजेल हाही एक प्रश्नच आहे. ह्यूमनॉइड नेहमी तंतोतंत मनुष्यांप्रमाणे विचार करतीलच असे नाही, कारण त्यांच्या विचारप्रक्रिया खऱ्या संज्ञानात्मक प्रक्रियेऐवजी सामान्यत: प्रोग्राम केलेले अल्गोरिदम किंवा डिसिजन ट्री असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ह्यूमनॉइडना स्वत: नि:पक्षपाती राहण्यासाठी तशा प्रकारची विदा उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.