आपले आरोग्य सांभाळण्यासाठी आता डॉक्टरांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ताही सरसावली आहे! अलीकडे अनेक जण स्मार्ट घडय़ाळ घालतात. त्यात तुम्ही किती चाललात, किती कॅलरी ऊर्जा खर्च केली, तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी गोष्टी अव्याहतपणे मोजल्या जातात. यातील आकडय़ांमध्ये मोठा फेरफार किंवा अनियमितता आढळली तर ते कळू शकते आणि डॉक्टरांनाही त्याविषयी माहिती देता येऊ शकते. या साध्या दिसणाऱ्या स्मार्ट घडय़ाळांनी जीव वाचविल्याची अनेक उदाहरणे आहेत! त्याचबरोबर रक्तातील साखर किंवा रक्तदाब अव्याहत मोजण्याचे यंत्र रुग्णाने धारण केले तर त्यातील फेरफार रुग्णाला किंवा त्याच्या डॉक्टरला कळू शकतो आणि पुढचा अनर्थ टळू शकतो.

स्मार्टफोन वापरून स्वत:च निदान करणारी एआय साधने (टूल्स) उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, अपचन अशा लहान-सहान तक्रारींसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडत नाही. डॉक्टरांवरचा भार हलका होतो. परंतु यात चुकीचे निदान होण्याचीही शक्यता असते. म्हणून सारासार विचार करून ते वापरायला हवे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगवर आधारित चॅटबॉटही उपलब्ध आहेत. त्यावर रुग्णांना डॉक्टरांशी संवाद साधता येतो. रुग्णाने सांगितलेल्या लक्षणांवरून डॉक्टर रोगनिदान करतात आणि औषधे सांगतात. आवश्यकता असेल तरच रुग्णाला डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट घेण्यास सांगितले जाते.

Don't believe these 5 myths about IVF
ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
Loksatta kutuhal Artificial intelligence and verbal communication
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाब्दिक संवाद
What are hormones
हार्मोन्स म्हणजे काय? स्त्रियांच्या शरीरावर त्यांचा कसा परिणाम होतो? घ्या जाणून …
Loksatta kutuhal Maculochpitts neuron Intelligence
कुतूहल: मॅक्युलोचपिट्स न्यूरॉन
loksatta kutuhal sense of smell and artificial intelligence
कुतूहल : गंधज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
Are you sleeping after 1 am? It can affect your mental health
Healthy sleep: तुम्हीही रात्री १ वाजता झोपता का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम
Loksatta kutuhal Weather forecasting and artificial intelligence
कुतूहल: हवामानाचा अंदाज व कृत्रिम बुद्धिमत्ता
loksatta kutuhal artificial intelligence in school bus
कुतूहल : शाळेची बस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

इंडोकारडाइटिस रोगात हृदयाच्या आतल्या स्तरावर सूज येते. छोटीशी शस्त्रक्रिया करून त्याचे निदान होते. अमेरिकेतील मायोक्लिनिकमधील संशोधकांनी एआय टूल तयार केले आहे, ज्याद्वारे रुग्णाचे अहवाल आणि लक्षणे यांच्याआधारे या रोगाचे ९९ टक्के अचूक निदान होते.

रक्तातील जंतुसंसर्गामुळे सेप्टिसेमिया होऊन रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. सूक्ष्मदर्शकयंत्राला एआय प्रणाली जोडून त्यातून रक्ताच्या काचपट्टय़ा बघितल्या तर रक्तामधील जंतूंचा त्वरित सुगावा लागतो. हेच एखाद्या तंत्रज्ञाने प्रत्यक्ष बघायचे झाले तर खूप वेळ लागतो. यात मशीन लर्निग अल्गोरिदम वापरतात. यासाठी यंत्राला जवळजवळ २५ हजार रक्त नमुन्यांच्या काचपट्टय़ा सूक्ष्मदर्शकातून दाखवून रोगजंतू कसे ओळखायचे याचे आधी प्रशिक्षण दिले जाते. यामुळे हे यंत्र रोगजंतू कसे ओळखावेत, हे शिकते. अशा साधनामुळे वेळ वाचतो आणि रुग्णांचा जीवही!

स्त्रियांना सव्‍‌र्हायकल कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्याचे निदान करण्यासाठी पॅप टेस्ट करतात. सव्‍‌र्हायकलपेशींची काचपट्टी बनवून सूक्ष्मदर्शका-खाली बघितली जाते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ऑटोमेटेड इमेजिंग सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर भराभर स्लाइड तपासते. कर्करोगपेशी शोधण्यासाठी या सॉफ्टवेअरला शंभर खुणा शिकवल्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात, कमी वेळेत कर्करोगाचे निदान होते. 

– बिपीन देशमाने ,मराठी विज्ञान परिषद