आपले आरोग्य सांभाळण्यासाठी आता डॉक्टरांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ताही सरसावली आहे! अलीकडे अनेक जण स्मार्ट घडय़ाळ घालतात. त्यात तुम्ही किती चाललात, किती कॅलरी ऊर्जा खर्च केली, तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी गोष्टी अव्याहतपणे मोजल्या जातात. यातील आकडय़ांमध्ये मोठा फेरफार किंवा अनियमितता आढळली तर ते कळू शकते आणि डॉक्टरांनाही त्याविषयी माहिती देता येऊ शकते. या साध्या दिसणाऱ्या स्मार्ट घडय़ाळांनी जीव वाचविल्याची अनेक उदाहरणे आहेत! त्याचबरोबर रक्तातील साखर किंवा रक्तदाब अव्याहत मोजण्याचे यंत्र रुग्णाने धारण केले तर त्यातील फेरफार रुग्णाला किंवा त्याच्या डॉक्टरला कळू शकतो आणि पुढचा अनर्थ टळू शकतो.

स्मार्टफोन वापरून स्वत:च निदान करणारी एआय साधने (टूल्स) उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, अपचन अशा लहान-सहान तक्रारींसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडत नाही. डॉक्टरांवरचा भार हलका होतो. परंतु यात चुकीचे निदान होण्याचीही शक्यता असते. म्हणून सारासार विचार करून ते वापरायला हवे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगवर आधारित चॅटबॉटही उपलब्ध आहेत. त्यावर रुग्णांना डॉक्टरांशी संवाद साधता येतो. रुग्णाने सांगितलेल्या लक्षणांवरून डॉक्टर रोगनिदान करतात आणि औषधे सांगतात. आवश्यकता असेल तरच रुग्णाला डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट घेण्यास सांगितले जाते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence and early diagnosis amy
First published on: 03-06-2024 at 05:14 IST