३आरोग्याशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो. हजारो रुग्ण असलेल्या मोठमोठय़ा रुग्णालयांच्या व्यवस्थापनापासून ते घरातील किंवा वृद्धाश्रमातील वृद्धांच्या शुश्रूषेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी पडू शकते.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रुग्णालय व्यवस्थापनात मोठी क्रांती घडू शकते. केसपेपरपासून सुरू होणारा प्रवास भविष्यात पूर्णपणे पेपरलेस होईल. मुंबई महानगरपालिका हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन (एचएमआयएस) सिस्टीम नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रणालीची अंमलबजावणी २०२५ पासून त्यांच्या सर्व रुग्णालयांमध्ये करणार आहे. मुंबईकरांना मोबाईल अ‍ॅप आणि वेब पोर्टलद्वारे रुग्णालयांमध्ये त्यांच्या अपॉइंटमेंट्स बुक करता येतील. या प्रणालीत रुग्णाची नोंदणी केल्यानंतर रुग्णाला युनिक आयडेंटिटी क्रमांक मिळेल. रुग्णाच्या आरोग्य इतिहासाची नोंद एचएमआयएसमध्ये केली जाईल. याला इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (ईएचआर) असे म्हणतात. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाच्या आरोग्याची पूर्वीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर संगणकाच्या पडद्यावर दिसेल. रुग्णाच्या रोगांचे ट्रेंडदेखील कळू शकतील. या सर्व प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता हातभार लावू शकते. त्यामुळे रुग्ण तपासणीचा वेग वाढू शकतो. रुग्णालयात लाखो रुग्णांची प्रचंड माहिती असते. कृत्रिम बुद्धिमत्ता या विदेवर काम करून रुग्णाच्या प्रकृतीविषयीचा भविष्यातील अंदाज वर्तवू  शकते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence and health research amy
First published on: 06-06-2024 at 00:53 IST