चंद्रावर १९६९-१९७२ च्या दरम्यान केलेल्या अपोलो मोहिमांना ५५ वर्षे उलटून गेल्यानंतर, २०२५ साली माणूस ‘आर्टेमिस’ मोहिमेअंतर्गत चंद्रावर परत जात आहे. यावेळी फक्त चंद्रावर जाऊन परत येण्याचे नाही तर तिथे प्रयोगशाळा आणि वसाहत बांधण्याचे ध्येय आहे. येत्या दशकांमध्ये मंगळावर पोहोचून तिथे वसाहत बांधण्याच्या योजना आखल्या जात आहेत. चंद्र आणि मंगळावरील मोहिमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सची साथ मोलाची ठरणार आहे.
सध्याच्या काळात चंद्र आणि मंगळावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रोव्हर्स आणि स्वयंचलित रोबोट्स काम करत आहेत. मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटी आणि पर्सिव्हिअरन्स रोव्हर्समध्ये ‘एजिस’ नावाचे (ऑटोनॉमस एक्सप्लोरेशन फॉर गॅदरिंग इन्क्रिज्ड सायन्स) कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रारूप वापरले जाते. एजिस मॉडेल न्यूरल नेटवर्कवर आधारित असून यात सखोल शिक्षण (डीप लर्निंग) आणि संगणकीय दृष्टीचा (कॉम्पुटर व्हिजन) वापर केला जातो. एजिसच्या आधारे रोव्हर मंगळावर मानवी हस्तक्षेपाशिवाय मार्ग शोधू शकते, काही प्रमाणात प्रयोग करू शकते.
अंतराळ मोहिमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट्स वापरले जातात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सायमन (र्क्यू इंटरॅक्टिव्ह मोबाइल कम्पॅनियन) नावाचा रोबोट वापरला जातो. सायमनला मानवी भाषा अवगत असून तो अंतराळप्रवाशांशी संवाद साधतो, विविध कामांसाठी साहाय्यक माहिती पुरवतो. नासाने ‘व्हल्करी’ नावाचे मानवसदृश रोबोट्स बनवले आहेत. या रोबोट्सना अनेक प्रकारची कामे करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. आर्टेमिस मोहिमेअंतर्गत चंद्रावर बांधकाम करण्यासाठी, तिथले पदार्थ गोळा करण्यासाठी, ज्या कामात जोखीम आहे तिथे मानवी जीव धोक्यात न घालता या रोबोट्सचा वापर केला जाईल. चंद्रावर बांधकाम करण्याच्या प्रकल्पासाठी नासाने ‘एआय स्पेसफेक्टरी’ नावाच्या कंपनीशी करार केला आहे. एआय स्पेसफेक्टरी ही चंद्रावर उपलब्ध साधनांचा वापर करून रोबोट्सच्या आधारे त्रिमिती प्रिंटिंग पद्धतीचा वापर करून तिथे बांधकाम करेल. हीच पद्धत पुढे मंगळावरील बांधकामासाठी वापरली जाईल. चीनमधील शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक रोबोट बनवला आहे जो मंगळावर ऑक्सिजननिर्मितीसाठी मदत करू शकतो. हा शोध लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेने मंगळावरील उल्कांचे गुणधर्म आणि रासायनिक प्रक्रियांचे सिम्युलेशन करणे सुरू करण्यात आले आणि त्या आधारे कार्यक्षम उत्प्रेरक (केटेलिस्ट) तयार केले गेले जे ऑक्सिजननिर्मितीसाठी मदत करू शकते. या प्रोग्रॅमच्या आधारे मंगळावरील दगडांचा आणि खनिजांचा वापर करून वसाहतीसाठी उपयुक्त असे इतरही घटक तयार करता येतील.