कृत्रिम बुद्धिमत्तेने माध्यमांच्या बातमी कक्षात चंचूप्रवेश केला आहे. याबाबत तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया फार सावध आहेत. काहींच्या मते कृत्रिम बुद्धिमत्तेने जी साधने उपलब्ध करून दिली आहेत त्यामुळे वार्ताहरांची खूप सोय झाली आहे. याचा परिणाम म्हणून पत्रकार आपला वेळ अधिकची माहिती गोळा करण्यासाठी, थोडक्या वेळेत अधिक लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी वापरेल आणि भाषांतरासाठी व बातमी तयार करण्यासाठी फारच कमी वेळ खर्च करतील. मशीन लर्निंग प्रारूपावर आधारित ‘स्टेज व्हिस्पर’ असे एक अॅप विकसित करण्यात आले असून पत्रकाराने घेतलेली मुलाखत ते तात्काळ व आपोआप शब्दांकित करते. स्टेज व्हिस्पर हे साधन २०२३च्या सप्टेंबर महिन्यात बाजारात आणले गेले. ते सध्या प्रचलित साधनांपेक्षा काही अंशी सुधारित व अधिक विकसित स्वरूपाचे आहे. विकसित यासाठी की ते अतिशय अचूक आहे. शिवाय त्याला इंटरनेटची गरज नाही आणि खास बात म्हणजे ते मोफत आहे. यात आजच्या घटकेला काही त्रुटीही आहेत. स्टेज व्हिस्परची गती आणखी वाढायला हवी. त्याचप्रमाणे बोलणाऱ्या दोन व्यक्तींत ते फरक करू शकत नाही, तसेच त्याला कार्यान्वित करण्यासाठी अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. हेही वाचा >>> कुतूहल: एडवर्ड फ्रेडकिन यापेक्षाही सरस साधने जनरेटिव्ह एआयच्या माध्यमातून न्यूजरूममध्ये आधीच पोहोचली आहेत आणि पत्रकारांना मदतही करू लागली आहेत. जीपीटी-३ सारखे विशाल भाषा प्रारूप (लार्ज लँग्वेज मॉडेल) हे साधन लेखक किंवा पत्रकारांना वरदान असून ते लेख लिहून पूर्ण करायला मदत करते. तर डॅली-२ हे जनरेटिव्ह साधन चित्रे / प्रतिमा निर्माण करणारे असून हवी तशी अगदी नवीन प्रतिमा तयार करायला मदत करते. नुकत्याच बाजारात आलेल्या स्वयंचलित भाषा आकलन प्रारूपामुळे वार्ताहराला सहजतेने आणि अचूकपणे मुलाखत शब्दबद्ध करता येते. काही पत्रकार मोफत साधनांबरोबरच ऑट्टर आणि ट्रिंट यांसारखी सशुल्क साधनेही वापरतात. ही सर्व साधने मशीन लर्निंग तत्त्वावर काम करतात आणि त्यांची प्रक्रिया बहुतांशी अचूक असते. या सर्व साधनांचा वापर करून पत्रकार /लेखक आपल्याकडील माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बनवलेल्या साधनांना पुरवून कमी वेळात अनोखी, मनोरंजक बातमी किंवा लेख तयार करू शकतात. बातमीचा लेखन दर्जा यामुळे सुधारेल. सुधारणा होत असेल तर अशा तंत्रज्ञानाचे नक्कीच स्वागत होईल. डॉ किशोर कुलकर्णी मराठी विज्ञान परिषद ईमेल : office@mavipa.org सकेंतस्थळ : www.mavipa.org