प्रशासनाला आता नागरिकांना सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होत आहे. समान पद्धतीच्या गुन्ह्यांची वारंवारिता, त्यातील आकृतिबंध, त्यावेळची सामाजिक परिस्थिती यांचा अभ्यास करून क्लस्टर अॅनालिसिस तसेच संभाव्य कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपाद्वारे (प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग) भविष्यातील गुन्हेगारीची संभाव्य क्षेत्रे निश्चित केली जाऊ शकतात. यामुळे अशा ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवता येते व ती अधिक काळजीपूर्वक पद्धतीने राबवली जाऊ शकते. त्याने गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेची सक्षमता वाढून सामान्य नागरिकांना संभाव्य गुन्ह्यांपासून संरक्षण मिळते.

याचबरोबर नैसर्गिक आपत्ती तसेच मानवनिर्मित संकटांच्या वेळी आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थांमध्ये संगणक दृष्टी (कॉम्प्युटर व्हिजन), प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग, ऑपरेशन्स रिसर्च यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. तो केल्यामुळे प्रशासनाला सुयोग्य, अचूक व वेगवान निर्णय घेणे शक्य होते. परिणामी नागरिकांना अधिक जलद व योग्य आपत्कालीन मदत मिळू शकते.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ

सखोल शिक्षण या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था तपासून पाहण्यासाठी, त्याचे सिम्युलेशन करण्यासाठी, विविध सैनिकी धोरणांच्या अभ्यासासाठीही केला जातो. संवेदकांचे जाळे (न्युरल नेटवर्क) आणि संगणकीय दृष्टी यामुळे असुरक्षित भागांतील तसेच सीमा भागांत हालचालींवर लक्ष ठेवता येऊन संभाव्य धोक्यांची आगाऊ आणि अचूक सूचना मिळवता येते.

प्रशासन सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देते. सरकारी रुग्णालयांत विविध अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकते. रोगांच्या उपचारादरम्यान विविध प्रकारचे संवेदक रुग्णावर २४ तास लक्ष ठेवून असतात. या संवेदकांद्वारे मिळणारी रुग्णासंबंधीची माहिती (रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, हृदयाचे ठोके) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीला सतत दिली जाते. ही प्रणाली या माहितीत होणारे बदल टिपून त्यात काही समस्या आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करू शकते.

कोविडकाळात वेगवेगळ्या प्रशासनांनी कोविडच्या रुग्णांकडून त्यांच्या स्थितीविषयी विदा एकत्रित केली होती. त्याआधारे तयार करण्यात आलेल्या प्रणालींचा वापर कोविडच्या नवीन रुग्णांचे योग्य निदान आणि अचूक उपचार करण्यासाठी केला जातो. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. याद्वारे रुग्णाचे एमआरआय स्कॅन झाल्यानंतर २० सेकंदाच्या आत त्याच्या हृदयरोगाचे निदान होऊ शकते. आणि उपचार सुरू होण्यातील विलंब टाळता येऊन रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.

प्रा किरण बर्वे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader