शहरांत शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बस व्यवस्था सहसा राबवली जाते. विद्यार्थी शहरातील विविध भागांत राहात असल्यामुळे एकाहून अधिक बस असलेला ताफा बाळगला जातो. बहुधा शाळा त्या ताफ्याचे व्यवस्थापन करते किंवा स्वतंत्र खासगी संस्थेला त्याचे कंत्राट देते. व्यवस्थापन कोणाचेही असो, लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना हाताळणे हे अतिशय जबाबदारीचे काम असते.

विद्यार्थ्यांचा प्रवास किमान वेळेत व्हावा, त्यांना बस पकडण्यासाठी घरापासून दूर जावे लागू नये, प्रवास सुरक्षित व्हावा आणि इष्टतम इंधन वापरले जावे ही बस व्यवस्थापनाची मुख्य उद्दिष्टे असतात. या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने जसे की, यंत्र अध्ययन, प्रगत डेटा विश्लेषण आणि अंदाज लावणाऱ्या पद्धती वापरणे प्रभावी ठरत आहेत. त्यांची विशिष्ट संवेदाकांद्वारे (सेन्सर्स) जीपीएस आणि इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणालींशी जोडणी करून संपूर्ण बस व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यास मदत मिळते.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने मूल्यमापन

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी बघून बसचा मार्ग बदलून, सर्व विद्यार्थ्यांना ठरावीक ठिकाणी आणि वेळेत पोहोचविण्याचे काम करू शकते. प्रत्येक बसचा मागोवा जीपीएस प्रणालीने ठेवता येत असल्याने व्यवस्थापन आणि पालकांना परिस्थितीचा अंदाज सतत येत असतो; काही अनपेक्षित घटना घडल्यास, योग्य निर्णय घेता येतो. बसमध्ये चढलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा चेहरा ओळखून प्रणाली त्या त्या वर्गाचा हजेरीपट भरू शकते ज्यायोगे वर्गात हजेरी घेण्याचा वेळ वाचतो आणि श्रम कमी होतात.

बस चालकाची वाहन चालवण्याची शैली जसे की, वाहन गती, त्वरण आणि ब्रेकचा वापर याबाबतची आकडेवारी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली तपासून चालकाला योग्य सूचना किंवा त्याला प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित करू शकते. त्याशिवाय विविध संवेदाकांकडून वेळोवेळी मिळत असलेली माहिती उदाहरणार्थ, इंजिनची कार्यक्षमता, इंधनाचा वापर, मुख्य भाग व टायर्सची झीज लक्षात घेऊन योग्य वेळी ते बदलण्याच्या सूचना अशी प्रणाली देते. त्यामुळे बसचे एकूण आयुष्य वाढण्यास मदत होते.

अर्थातच विद्यार्थी आणि चालक व वाहक यांची खासगी माहिती तसेच जीपीएसने प्राप्त केलेली आणि देखभालीची माहिती गोपनीय राखणे गरजेचे असते. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्यापकता शाळेची बस व्यवस्था विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि आनंददायी होण्यास मदत करते असा अनुभव आहे.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org