आज मानवी अंतराळयाने, लॅण्डर्स, रोव्हर्स, प्रोब्ज सूर्यमालेत सर्वदूर पोहोचले आहेत आणि विविध शोध लावत आहेत. काही प्रोब्ज सूर्यमालेच्या बाहेरही पोहोचले आहेत. नासाने १९७७ साली सोडलेली ‘व्हॉयेजर १’ आणि ‘व्हॉयेजर २’ अंतराळयाने आता प्रत्येकी २४ अब्ज आणि २० अब्ज किलोमीटर्सहून अधिक अंतरावर पोहोचली आहेत. मानवप्रजातीचा संदेश असलेले ‘गोल्डन रेकॉर्ड्स’ या अंतराळयानांवर आहेत. आकाशगंगेतील इतर तारे-ग्रह आपल्यापासून कित्येक प्रकाशवर्ष दूर असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अंतराळयानांना शेकडो ते हजारो वर्षे लागू शकतात. अशा परिस्थितीत सूर्यमालेबाहेर मानवी मोहिमा अशक्यप्राय आहेत. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सच्या आधारे सूर्यमालेच्या बाहेर मोहिमांची आखणी करणे शक्य झाले आहे. सूर्यमालेबाहेरच्या मोहिमांमध्ये अंतराळात स्वत: मार्ग शोधू शकणारी, बाह्य परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकणारी आणि नवी माहिती गोळा करून विश्लेषण करू शकणारी यंत्रणा महत्त्वाची ठरेल. इटलीमधील आयको (एआयकेओ) कंपनीने अंतराळ मोहिमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘मिराज’ (एम आय आर ए जी ई ) नावाची सॉफ्टवेयर लायब्ररी बनवली आहे. (डीप लर्निंग) सखोल शिक्षणाचा वापर करत मिराज आधारित यंत्रणा मानवी हस्तक्षेपाशिवाय काम करू शकते. बुद्धिमान स्पेस प्रोब्जवर आणि स्वयंचलित यंत्रणांवर आधारित सूर्यमालेबाहेरच्या काही मोहिमा आखल्या गेल्या आहेत. ‘ब्रेकथ्रू स्टारशॉट’ मोहीम, नासाची ‘इंटरस्टेलर प्रोब’ मोहीम, चीनची ‘इंटरस्टेलर एक्सप्रेस’ मोहीम यांच्यावर सध्या काम सुरू आहे. मॅक्स टेगमार्क यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर गाजलेल्या ‘लाईफ ३.०’ पुस्तकात भविष्यातील अंतराळ मोहिमांच्या कल्पना मांडल्या आहेत. त्यानुसार जवळच्या परग्रहांच्या दिशेने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रोब्ज, रोबोट्स पाठवता येतील. हे रोबोट्स तिथे पोहोचून रेडिओ अँटेना बांधतील आणि तिथे वेगवेगळे प्रयोग करून त्यांची माहिती पृथ्वीला पाठवतील. बाह्यग्रहांवर बुद्धिमान रोबोट्सच्या मदतीने स्वयंचलित प्रयोगशाळा बांधता येतील. परग्रहांवर जीवसृष्टी शोधण्याच्या गॅलिलिओ प्रकल्पाचे मुख्य अॅव्ही लोब यांच्यामते भविष्यात आपल्या जवळच्या परग्रहांवर प्रोब्ज, रोबोट्स पाठवून ताऱ्यांच्या पातळीवरील माहितीचे जाळे विणता येईल, यातून अनेक नवे शोध लागू शकतील. ज्या परग्रहांवर जीवसृष्टीला अनुकूल पाणी आणि वातावरण आहे अशा काही ठिकाणी जीवोत्पत्ती घडली असण्याची शक्यता आहे. अशा परग्रहांवर बुद्धिमान रोबोट्स पाठवून तिथल्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे साक्षीदार होण्याची संधी आपल्याला मिळू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे सूर्यमालेच्या बाहेर डोकावण्याची क्षमता मानवप्रजातीला मिळाली आहे.