विभिन्न प्रकारच्या खडकांपासून भौतिक, रासायनिक आणि जैविक विघटन होत होत, शेवटच्या स्थित्यंतरात मातीची निर्मिती होते. हीच माती वनस्पती, जंगले आणि शेतीसाठी अन्नद्रव्यांचा स्राोत आणि आधार ठरते. वनांच्या निर्मितीबरोबरच भूगर्भामधील जलसाठ्याचे जतन करण्याचे मौल्यवान कार्यही माती करते.
खडकांपासून माती तयार होते, तेव्हा त्यांच्या मूळ रासायनिक घटकांनुसार, त्यांच्या खनिजांमधून जी मूलद्रव्ये मातीत येतात त्या मूलद्रव्यांनुसार मातीला रंग येतो. पृथ्वीच्या कवचातल्या खडकांमध्ये मुख्यत: लोह, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम यांची सिलिकेट रूपातल्या संयुगांची खनिजे कमी-जास्त प्रमाणात असतात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये पाण्याच्या सान्निध्यात आल्याने या खडकांवर भौतिक आणि रासायनिक विघटन होऊन झीज आणि अनाच्छादनाची (डेन्युडेशन) क्रिया घडते, तेव्हा रासायनिक निक्षालन (लीचिंग) प्रक्रियेत प्राधान्याने सोडियम आणि पोटॅशियम ही खनिजे पाण्यात विरघळून प्रवाहात विद्राव्य स्वरूपात गठित होत राहतात. दीर्घकाळ अखंडपणे चालू राहणाऱ्या या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये कालांतराने कॅल्शियम व मॅग्नेशियमचे घटकही पाण्याच्या प्रवाहात निक्षालित होऊन विरघळतात.
या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात खडकांमधील लोह आणि अल्युमिनियम हे घटक विद्राव्य नसल्याने अवशिष्ट भाग म्हणून, गाळ-मातीच्या रूपात, लहान-मोठ्या माती आणि वाळूच्या कणांमध्ये, अथवा नवीन माती खनिजांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारच्या खडकांपासून लक्षावधी वर्षांनी तपकिरी, लालसर वा पांढरी माती तयार झाल्याचे आढळते. मातीत लोहाचे प्रमाण जास्त असल्यास त्या मातीचा रंग लालसर तांबूस असतो आणि ती जड असते. जेव्हा मातीमध्ये अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते, तेव्हा ती पांढरट असते आणि वजनाला हलकी असते.
मातीमध्ये जैविक सेंद्रिय कार्बन वाढू लागतो तेव्हाच तिला काळसर रंग येतो. अर्थात हा रंग सेंद्रिय कार्बन, मृत वनस्पती, मृत प्राणी, कीटक त्याचप्रमाणे जिवाणूंमुळे येतो. अशी काळी जैविक सुपिक माती नेहमीच जास्त धान्य उत्पादन देते. विद्राव्य स्वरूपातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे वाहत्या पाण्याबरोबर प्रवाहित होतात किंवा भूजलात समाविष्ट होतात. याचा परिणाम म्हणून भूजल मचूळ आणि खारट होते. महाराष्ट्रातील काळ्या कातळात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने आणि सोडियम कमी असल्याने येथील भूजल हे ‘कठीण पाणी’ असते. त्यामुळे बहुतांश कमी पावसाच्या आणि दुष्काळी, उष्ण भागात चुनखडीमिश्रित माती आढळते. आपल्याकडे बहुतांश भागातून तपकिरी पांढरट रंगाची आणि भुरकट राखाडी, मुरमाड माती आढळते. परंपरागत शेतजमिनी, बारमाही नदीकाठ आणि मैदानी पूरभागात काळी माती आढळते.
– डॉ. श्रीनिवास वडगबाळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org