जगात अनेक कंपन्यांनी प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेल्या ह्युमनॉइड्सच्या रचनेचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन करण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे येत्या काही वर्षांत नवनव्या प्रकारचे ह्युमनॉइड्स पाहण्यास मिळू शकतात. मानवी स्वरूप आणि वर्तनाची एकप्रकारे नक्कल करण्यासाठी निर्माण केलेले हे ह्युमनॉइड्स आरोग्यसेवा, मनोरंजन, शिक्षण, खासगी मदतनीस अशा विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतील. आतापर्यंत फक्त विज्ञानकथांमध्ये किंवा साय-फाय चित्रपटात दिसणारे ह्युमनॉइड्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होतील. त्यांचा आपल्याला फायदा होईलच, पण या ह्युमनॉइड्सचा आपल्याला काय त्रास होऊ शकतो यावर विचार करणेही गरजेचे आहे. ह्युमनॉइड्सची कार्यक्षमता माणसांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे ते अनेक माणसांचे काम एका फटक्यात करतील. उदाहरणार्थ एक मानवी डॉक्टर एकावेळी एकाच रुग्णाला तपासू शकतो. पण ह्युमनॉइड डॉक्टर एका वेळेस अनेक रुग्णांशी संवाद साधून त्यांना तपासू शकतो. या ह्युमनॉइड डॉक्टरला मानवी मर्यादा नसल्यामुळे तो २४ तास उपलब्ध असू शकतो. विविध प्रकारचे ह्युमनॉइड्स विकसित करण्यासाठी मानवी शरीरातली अनेक जैवरासायनिक क्रियांचा बारकाईने अभ्यास केला जातो. कोणत्या परिस्थितीत माणसे कसे वर्तन करतात, माणसांची निर्णय घेण्याची पद्धत काय असते याचाही सखोल अभ्यास केला जातो. यामुळे ह्युमनॉइड्सना आपोआपच माणसांची भरपूर माहिती मिळते. त्यामुळे ते हळूहळू माणसांपेक्षा जास्त हुशार होतील अशी भीती अनेक संशोधक व्यक्त करत आहेत. काही संशोधकांना तर ह्युमनॉइड्स माणसांना नष्ट करतील अशी भीती वाटते. ह्युमनॉइड्समुळे अनेक सामाजिक आणि नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. ह्युमनॉइड्स कृत्रिम असल्यामुळे त्यांच्या भावना आपल्याला हव्या तशा नियंत्रित करता येऊ शकतात. त्यामुळे एखाद्या माणसाचा त्यांच्याबरोबरचा संवाद त्याला हवा तसाच होऊ शकतो. पण दोन माणसांमधल्या संवादात असे होऊ शकत नाही. त्यामुळे माणसामाणसांतला संवाद कमी होऊन, माणसे ह्युमनॉइड्सबरोबर राहणे जास्त पसंत करतील असा एक धोका संभवतो. एखादवेळेस कोणीतरी ह्युमनॉइडच्या प्रेमातच पडले तर काय गोंधळ होईल याची कल्पनाच केलेली बरी! ह्युमनॉइड्सच्या भावना भडकावून त्यांना युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमतेच्या क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी माणसाचे मन म्हणजे काय, मानवी प्रज्ञा म्हणजे काय, याचा उलगडा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ह्युमनॉइड्स माणसांवर कधीही मात करू शकणार नाहीत असा विश्वास काही संशोधकांना वाटतो. नक्की काय होईल ते मात्र येणारा काळच ठरवेल. - प्रा. माधवी ठाकूरदेसाई मराठी विज्ञान परिषद ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org