कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने न्यूज रूममध्ये जरी कार्यरत झाली तरी ही साधने मानवी पत्रकारांची जागा घेणार नाहीत असे आजच्या पिढीला व घडीला तरी निश्चित वाटते. यामुळे पत्रकारांच्या कार्यप्रणालीत बराच बदल अपेक्षित आहे. तंत्रज्ञानाने जसे अनेक क्षेत्रांत तांत्रिक बदल घडवून आणले त्याच दृष्टिकोनातून या बदलाकडे पाहता येईल, असे जाणते पत्रकार म्हणतात. प्रतिलेखन किंवा लिप्यांतर यामध्ये पत्रकारांचा जो वेळ जात होता तो त्यांना वाचवता येऊ शकेल आणि इतर गोष्टींना जसे की मुलाखत घेणे, माहिती गोळा करणे याला ते अधिक वेळ देऊ शकतील. मात्र ही साधने न्यूज रूममध्ये आल्याने पत्रकारितेच्या नैतिकतेला तिलांजली द्यायची का, असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. कारण अनेकदा असेही घडेल की चित्रपत्रकारिता करणारे जे कलाकार आहेत त्यांनी काढलेल्या किंवा सुचवलेल्या कल्पनांवर आधारित जनरेटिव्ह एआयच्या आधारे काढलेले चित्र सरस ठरले तर पत्रकारिता नैतिकतेच्या कक्षेत ते बसते का? आणि ते चित्र कल्पनेप्रमाणे नसेल तर? तर मग असे चित्र दर्शकांच्या माथी मारायचे का? हा एक मोठा विवादित प्रश्न आहे. तो कसा सोडवणार?

समजा एखाद्या पत्रकाराने विशाल भाषा प्रारूप (लार्ज लँग्वेज मॉडेल) वापरून एखादा लेख लिहिला तर त्याला वाङ्मय चौर्याचे कलम लावायचे का? की अफलातून/ उत्कृष्ट म्हणून त्याचा गौरव करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे ही साधने न्यूज रूममध्ये कायमस्वरूपी रुळण्याआधी सोडविणे अत्यावश्यक आहे. तसे प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून सुरू आहेत. या साधनांचा बातमीदारीच्या क्षेत्रावर दोन प्रकारे परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.

एक म्हणजे बातमी तयार करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी जो खर्च येतो तो कमी करण्यासाठी भाषांतर तंत्राचा वापर करणे आणि तयार केलेली बातमी अनेक भाषांमध्ये विविध देशांना एकाच वेळी पुरवणे सहज शक्य आहे. हे असे झाले तर साहजिकच प्रादेशिक भाषांत पत्रकारिता करणाऱ्यांची आणि भाषांतरकारांची नोकरी संपुष्टात येण्याचा धोका आहे. कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की काही नोकऱ्यांवर गदा येतेच, पण त्याच वेळी नवीन नोकऱ्याही उपलब्ध होतात. दुसरा मुद्दा असा की यामुळे पत्रकारितेतील लेखनाचा दर्जा सुधारेल. दर्जात सुधारणा होत असेल तरच असे तंत्रज्ञान वापरणे योग्य असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.