कोलकातापासून १९० किलोमीटर अंतरावर असलेल्या साइनथिआ या गावी ४ एप्रिल १९३८ रोजी आनंद मोहन चक्रवर्ती यांचा जन्म झाला. बेळूरमठ येथील रामकृष्ण मिशन विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले. कोलकाता येथील सेंट झेविअर महाविद्यालयात बी.एस्सी. आणि पुढे कोलकाता विद्यापीठात एम.एस्सी. आणि पीएच.डी.चा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. १९६५ साली चक्रवर्ती अमेरिकेला गेले. त्यांनी प्रोफेसर आय. सी. गुनसालूस यांच्या मार्गदर्शनाखाली इलिनॉइस विद्यापीठात मॉलेक्युलर जेनेटिक्स या विषयात संशोधन सुरू केले.

आनंद मोहन चक्रवर्ती हे भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. अमेरिकेच्या ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन’च्या सर्वच शास्त्रज्ञांपुढे समुद्रातील तेलाच्या गळतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या गळतीमुळे जलपरिसंस्था धोक्यात आल्या होत्या. या प्रश्नाला उत्तर दिले ते डॉ. आनंद चक्रवर्ती या भारतीय शास्त्रज्ञाने.

कार्बन आणि हायड्रोजन यांनी तयार केलेली हायड्रोकार्बन्स (तेल) सुडोमोनास प्यूटिडा नावाचा जिवाणू खाद्या म्हणून वापरू शकतो. याला बायोरेमीडिएशन म्हणतात. अशुद्ध तेल विविध प्रकारच्या हायड्रोकार्बन्सचे मिश्रण असते. या जिवाणूच्या प्लासमिडवरील चार जनुके हायड्रोकार्बन्सच्या खंडनासाठी महत्त्वपूर्ण ठरतात, हे डॉ. आनंद चक्रवर्ती यांनी सिद्ध केले. कॅम्फर, ऑक्टेन, झायलीन आणि नेपथेन ही ती चार हायड्रोकार्बन्स. प्लासमिडच्या जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने सुडोमोनास प्यूटिडा जिवाणूत या चार जनुकांचे रोपण करून त्यात उत्परिवर्तन घडवून विशेष जिवाणू ‘ G’ची निर्मित करण्यात डॉ. आनंद चक्रवर्ती यशस्वी झाले. डॉ. चक्रवर्ती यांनी या नव्या जिवाणूसाठी एकस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. डॉ. आनंद चक्रवर्ती यांचा अमेरिकेत एकस्व अधिकारासाठी चाललेला हा लढा विज्ञानक्षेत्रात गाजला. अखेरीस १९ जून १९८० रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि विज्ञान क्षेत्रात जनुक-अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून निर्माण केलेले असे अनेक सूक्ष्मजीव जगभर उपलब्ध झाले.

‘बगिंग कॅन्सर’ आणि ‘डेअरिंग टु ड्रीम’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना अमेरिकेच्या औद्याोगिक संशोधन संस्थेचा १९७५ सालचा उत्तम शास्त्रज्ञ पुरस्कार प्राप्त झाला. अमेरिकन सैन्यदलाचा विशेष सेवा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. ‘अमेरिकन सोसायटी फॉर मायाक्रोबायॉलॉजी’च्या ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’ पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जैव-अभियांत्रिकी-तंत्रज्ञान या विषयातील त्यांच्या कार्याबद्दल भारतीय शासनाने पद्माश्री पुरस्कार देऊन २००७ साली त्यांना सन्मानित केले. १० जुलै २०२० रोजी त्यांचे निधन झाले.

डॉ. रंजन गर्गे, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org