कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून मानवजातीला क्लिष्ट समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासोबत ती वाईट हेतूंसाठीदेखील वापरली जाऊ शकते हे वास्तव आहे. त्यामुळेच, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून होऊ शकणारे निवडक गुन्हे किंवा गैरप्रकार कोणते, हे आपण पाहू आणि ते टाळण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल हेही समजून घेऊ.

तोतया प्रतिमा (डीपफेक इमेज) अर्थात गैरसमज पसरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता खुबीने वापरून व्यक्तीची तोतया छायाचित्रे, चलदृश्ये (व्हिडीओज्) किंवा ध्वनिफिती (ऑडिओज्) तयार करून फसगत करणे, हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित गुन्ह्यां’चे सर्रास आढळणारे उदाहरण आहे.  एका  प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रतिमा दुसऱ्याच महिलेच्या प्रतिमेवर लादून त्या अभिनेत्रीची बदनामी करणारी अलीकडलीच एक घटना. याशिवाय विद्यमान पंतप्रधान गरबा खेळतानाची दृश्यफीत काही दिवसांपूर्वी बऱ्याच माध्यमांवर झळकली होती, तीही याच तंत्रज्ञानावर आधारित होती. अशाच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने २०२० मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा आवाज काढून इंग्लंडमधील एका ऊर्जा कंपनीतून सुमारे २४ दशलक्ष डॉलर्स लंपास केले गेले, ही तर या प्रकाराची नांदीच होती. 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal cyber crime and artificial intelligence amy
First published on: 20-05-2024 at 02:06 IST