मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गाच्या शिक्षकाला कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त मूल्यांकन प्रणाल्या शीघ्रतेने उत्तरपत्रिका तपासून देण्यात साहाय्य करतात. त्यासोबत प्रत्येक परीक्षेत विद्यार्थी कुठे कमी पडला याचे विश्लेषणही देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन मिळते. त्याशिवाय शिक्षकाला विषय शिकवताना काय काळज्या घेतल्या पाहिजेत, कुठे अधिक उदाहरणे आणि चित्रे दिली पाहिजेत याबाबत शिफारसी अशा प्रणाल्या देतात. त्याच्या पुढे जाऊन, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासही त्या सक्षम असतात, ज्यामुळे निरंतर मूल्यमापन करणे सहज शक्य होते.

हेही वाचा >>> कुतूहल: यंत्रमानव शिक्षक होतात तेव्हा…

या संदर्भात, ‘‘कॉम्प्युटर एनेबल्ड कंटिन्यूअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन (सीसीई) युझिंग अॅडेप्टिव्ह लर्निंग टेक्नोलॉजीज्’’ असा प्रकल्प भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सी-डीएसी या तिच्या प्रगत संगणन संस्थेमार्फत फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन (फोसी) विकसन या उपक्रमाखाली हाती घेतला आहे. त्याच्या अंतर्गत प्रश्नपत्र बँक व्यवस्थापन, रचनात्मक (फॉर्मेटीव) आणि साकारिक (समेटीव) मूल्यमापन आणि त्यांच्या एकत्रीकरणासाठी ‘सीसीई’ ही नि:शुल्क व खुली प्रणाली उपलब्ध केली जात आहे. ही प्रणाली त्याशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचं अध्ययन आणि अध्यापनासाठी स्थिर व चलचित्रं निर्माण करून देते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सखोल वापर या सर्व कामात होत आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: शिक्षणक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता

माध्यमिक आणि उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांनी प्रकल्प करून अहवाल सादर करणे हे अनिवार्य होत जात आहे. मात्र इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटजीपीटीसारख्या प्रणालींमुळे वाङ्मयचौर्याची अनिष्ट प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये सर्वदूर वाढली आहे. म्हणजे अशा प्रणालींचा वापर करून प्रकल्प अहवाल किंवा निबंध सादर करणे ही पळवाट वापरण्यावर भर आढळतो. तरी, असे चौर्य शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या वेगळ्या विशेष प्रणाली विकसित केल्या गेल्या आहेत. आता बहुतेक सर्व विद्यापीठे त्यांना उच्च पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधांची अशी तपासणी करतात किंवा विद्यार्थ्याला स्वत: तशी तपासणी करून त्याचा अहवाल जोडण्यास सांगतात. अशीच व्यवस्था नामवंत शोधपत्रिकांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या शोधलेखांबाबत वापरण्यास सुरुवात झाली आहे. याची सकारात्मक बाजू अशी की, आक्षेपार्ह मजकूर कसा सुधारावा तसेच दोषमुक्त लिखाण कसे असावे याचे मार्गदर्शन विविध उदाहरणे देऊन त्यापैकी कित्येक प्रणाल्या करतात. या अंगाने विद्यार्थी व संशोधक आपले लिखाण व सादरीकरण परिपक्व करू शकतात.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader