घरी केलेला पदार्थ असो की तयार प्रक्रिया केलेलं अन्न असो, कालांतराने खराब होतंच. असं का? अन्न शिजवल्यापासूनच त्याचा दर्जा कमी व्हायला लागतो. कारण हळूहळू त्या पदार्थात हानिकारक जंतूंची वाढ होते. हे जंतू असतात कुठे? तर वातावरणात किंवा सुप्त स्वरूपात त्या त्या पदार्थातही! हे जंतू विविध प्रकारचे असून, ते थंड तापमानापासून ते अगदी ५० अंश सेल्सियस इतक्या उष्ण तापमानात वाढणारे असू शकतात. शिवाय हवेतल्या प्राणवायूशी अभिक्रिया झाल्यामुळेसुद्धा अन्नाचा दर्जा कमी होतो. म्हणून तर ताजे अन्न पदार्थ खावेत, असं सांगितलं जातं.
प्रत्येक अन्नपदार्थ त्या त्या पदार्थानुसार, योग्य त्या तापमानाला ठेवावा. आपण घरात जे पदार्थ करतो, त्यातलं उरलेलं अन्न शीतकपाटात ठेवतो. शीतकपाटात पदार्थ ताजाच राहणार, अशी आपली समजूत असते. पण तसं नसतं! त्या पदार्थामध्ये घडणार्या, अन्न दूषित करणार्या, अभिक्रियांचा वेग शीतकपाटात ठेवल्याने मंदावतो इतकंच. त्यामुळे जेव्हा फ्रिजमध्ये ठेवूनही वरणाला बुरशी येते तेव्हा ते वरण किती दिवसांपूर्वी आत गेलं आहे, हे आठवावं!
प्रक्रिया केलेलं अन्न आणि दूध याबाबतही हे खरं आहे. उदाहरणार्थ पाश्चराइज्ड दूध पिशवीतून घरी येतं, ती पिशवी थंड असली पाहिजे आणि लगेच वापरायची नसेल तर थंडच राखली पाहिजे. मात्र या प्रक्रियेने दूध निर्जंतुक होत नाही तर केवळ ते दूध काही काळ टिकण्यास मदत होते आणि हवेशी संपर्क आला किंवा मुदत उलटून गेली की ते खराब होऊ शकतं.
शिवाय हे दूध निर्जंतुक वातावरणात पिशवीमध्ये भरलं जात नाही. त्याउलट, विशेष प्रक्रिया केलेलं दूध; तसंच अन्न टिकवणारी रसायनं ‘नसलेले’, लगेच खाता येत असलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे निर्जंतुक वातावरणात तयार केले जातात आणि पिशवीत बंद केले जातात. त्यामुळे ते सहा ते नऊ महिनेसुद्धा टिकतात. मात्र पिशवी उघडल्यानंतर त्यांचा हवेशी संपर्क येतो आणि अभिक्रिया सुरू होते. शिवाय जंतूंची वाढही होऊ शकते. म्हणून उघडल्यावर तो पदार्थ त्याच वेळी खाऊन संपवावा, अशी सूचना पिशवीवर असते. अशा सूचना पिशवी घेतानाच वाचून, त्यानुसार ते खाद्यपदार्थ सेवन करणं किंवा साठवणं आवश्यक आहे.
प्रक्रिया केलेलं खाद्यान्नाचं पाकीट फुगलेलं असेल तर वापरू नका अशी सूचना त्यावर का असते? तर अशा पिशवीमध्ये जंतू वाढून त्या वाढीच्या प्रक्रियेतून काही वायू बाहेर पडतात आणि त्यामुळे ती पिशवी फुगते. म्हणून फुगलेल्या खाद्यान्नाच्या पाकिटातले पदार्थ खाऊ नयेत.
– प्रमोद देवधर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
