ह्युमनॉइडने माणसांसारखा विचार करून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. त्यामुळे ह्युमनॉइड्स विकसित करताना प्रामुख्याने पाच गोष्टींचा विचार करावा लागेल. यातली पहिली गोष्ट आहे ह्युमनॉइड्सची समज किंवा आकलनशक्ती. ह्युमनॉइड्समध्ये आजूबाजूचा परिसर नीट न्याहाळता येईल अशा प्रकारची (कॉम्प्युटर व्हिजन) संगणकीय दृष्टी असावी लागेल. त्याचप्रमाणे चव, वास, आवाज, तापमान, हालचाल यांच्यातील अतिसूक्ष्म भेदही टिपू शकतील असे प्रभावी संवेदक असावे लागतील. मानव-ह्युमनॉइड यांच्यातील परस्पर संवाद महत्त्वाचा ठरतो. ह्युमनॉइड किती प्रभावीपणे माणसांशी साधू शकतील यावरच त्यांचे बरचसे यश अवलंबून असते. यासाठी ह्युमनॉइड्सना माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव नीट वाचता यावे लागतील. याला ‘फेशियल रेकग्निशन’ म्हणतात. आपल्यासमोरून एखादा माणूस वेगाने गेला तर आपण त्या माणसाला ओळखू शकतो. त्यासाठी आपल्या डोळ्यांची विशिष्ट गुंतागुंतीची रचना साहाय्यभूत ठरते. ह्युमनॉइडमध्ये ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आणावी लागेल. याला व्हीओआर (वेस्टीब्ल्युलर ऑक्युलर रिफ्लेक्स) म्हटले जाते. म्हणजे डोके हलताना दृष्टी स्थिर ठेवण्याची कृती. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आता ही अवघड गोष्ट साध्य करता येऊ लागली आहे. ह्युमनॉइड्सना बदलांना तोंड देण्यासाठी सक्षम करावे लागेल. यासाठी मशीन-लर्निंग तंत्राचा वापर केला जातो. याचा फायदा म्हणजे हळूहळू ह्युमनॉइड्सना दैनंदिन कामांमधला क्रम लक्षात येईल. उदाहरणार्थ जर एखाद्या रुग्णाचे दात घासायचे असतील तर सुरुवातीला ह्युमनॉइड्सना दात घासण्याच्या क्रियेतील प्रत्येक पायरी विस्ताराने सांगावी लागेल. पण नंतर हळूहळू ते काम कसे करायचे हे ते स्वत:चे स्वत:च ठरवतील. ह्युमनॉइड्सना जिना चढणे- उतरणे, खडबडीत पृष्ठभागावरून चालणे, उड्या मारणे अशा गोष्टी करता येतील असे पाय द्यावे लागतील. याला ‘लेग्ड लोकोमोशन’ म्हटले जाते. यात ह्युमनॉइड्सना फक्त पाय मागे-पुढे करता येणे अभिप्रेत नाही. माणसे पाय वापरून अनेक क्रिया करताना जसा स्वत:चा तोल सांभाळतात तसे स्वत:चा तोल सांभाळत पायांचा वापर करणे ह्युमनॉइड्सना शिकावे लागेल. हे साध्य करणे खूप कष्टाचे आहे. ह्युमनॉइड्सना तोल सांभाळणे, भाज्या चिरणे, कॉफी ओतणे अशा साध्यासाध्या कामांबरोबरच टेलिसर्जरी करणे, चंद्रावर उतरून उत्खनन करणे अशी उच्च कौशल्ये आवश्यक असणारी कामेही करावी लागतील. यांत्रिक दृष्टिकोनातूनही ह्युमनॉइड्स खूपच प्रगत झाले आहेत. असे हे ह्युमनॉइड्स लहान मुले, वृद्ध, अपंग, अशांची काळजी घेण्यासाठी जिथे मनुष्यबळाची कमतरता आहे तिथे एक मोठे वरदान ठरतील.