माणसाचे गुण खुलतात ते बुद्धीने, तर रूपाचे सौंदर्य अधिक खुलते ते अलंकारांनी म्हणजेच दागिन्यांनी! दागिने म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ते सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंनी घडवलेले दागिने, ज्याला आपण ‘खरे’ दागिने म्हणतो. पण चकाकतं, ते सर्व सोनं नसतं, या उक्तीप्रमाणे सगळे पिवळ्या रंगाचे दागिने हे सोन्याचे नसतात. सोने-चांदीसदृश दिसणार्‍या, पण प्रत्यक्षात या मौल्यवान धातूंचे नसणार्‍या दागिन्यांना आपण ‘खोटे’ दागिने म्हणतो.

हे खोटे दागिने जस्त, तांबं, लोखंड, निकेल, क्रोमियम यांसारख्या काही धातूंपासून तयार केल्या जाणार्‍या पितळ किंवा स्टेनलेस स्टील अशा मिश्रणांचे असतात. अशा मिश्रणांपासून तयार केलेल्या दागिन्यांनाच हल्ली इमिटेशन ज्वेलरी म्हटले जाते. पितळ किंवा स्टील तयार करताना, वर उल्लेख केलेल्या धातूंपैकी ठरावीक धातूंचे योग्य प्रमाण घेऊन, ते उच्च तापमानाला तापवतात आणि ते द्रवरूप झाल्यावर साचामध्ये ओतून थंड करतात. हे मिश्रण तन्य म्हणजेच ताणता येण्यासारखे आणि वर्धनीय म्हणजेच ठोकून पत्रा तयार करता येण्यासारखे असल्यामुळे त्यांच्या तारा किंवा पत्रे करता येतात.

मग त्यापासून बांगड्या, अंगठ्या, हार असे विविध प्रकारचे दागिने तयार करतात. हे घडवताना त्यावर सुंदर नक्षीकाम केलं जातं आणि त्यात कधी मोती, हिरा, मणी गुंफले वा बसवले जातात. त्यामुळे या दागिन्यांचं सौंदर्य अधिकच वाढतं. मुख्य म्हणजे या दागिन्यांवर, विद्युत रासायनिक प्रक्रियेद्वारे, सोन्याचा मुलामा दिला जातो. मुलामा दिल्यामुळे, हे दागिने खर्‍या दागिन्यांसारखे दिसतात. चांदीसारखे दिसणारे, परंतु चांदी नसणारे, असे जस्त, कॉपर आणि निकेल यांच्या मिश्रणातून बनलेले म्हणजेच जर्मन सिल्व्हरचे दागिने! 

शुद्ध सोनं किंवा चांदी यांची घनता पितळ किंवा स्टील यांच्यापेक्षा जास्त असली, तरी पितळी किंवा स्टीलचे दागिने, सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा जड असतात! या सर्वांचे सारख्या आकाराचे गोळे घेतले तर सोन्या-चांदीचं वजन जास्त भरतं. परंतु सोन्या-चांदीच्या अतिशय जास्त किमतीमुळे, कारागीर सोन्या-चांदीचे दागिने आतून पोकळ ठेवतात आणि त्यावर अतिशय बारीक कलाकुसर करतात. पण पितळ आणि स्टील ही मिश्रणं स्वस्त असतात. त्यामुळे त्यांच्यापासून बनवलेले दागिने भरीव असतात.

शिवाय ही मिश्रणं, सोन्या-चांदीच्या तुलनेत थोडी कडक असतात, त्यामुळे अतिशय बारीक तार किंवा अतिशय पातळ पत्रा तयार करणं कठीण असतं. त्यामुळे खोटे दागिने थोडे जाड ठेवावे लागतात. भरीव आणि थोडे जाडसर असल्यामुळे खोटे दागिने, सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा जड असतात.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांना असणारं मूल्य खोट्या दागिन्यांना नसतं, कारण ते ज्या धातूंपासून तयार करतात ते धातू मौल्यवान आणि शुद्ध स्वरूपात नसतात. 

– उर्मिला फडके

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org