scorecardresearch

कुतूहल : पहिले भारतीय विमानरचना शास्त्रज्ञ

भारतीय वायुसेनेसाठी प्राथमिक प्रशिक्षणास आवश्यक असे, ‘पुष्पक’ हे दोन माणसे नेणारे अत्यंत हलके विमानही त्यांनी तयार केले.

विष्णू माधव घाटगे यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९०८ रोजी कोल्हापूरमधील हसूर येथे झाला. ते अभियंता, विमानविद्याशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि पहिले भारतीय विमानरचना शास्त्रज्ञ होते. १९३६-४२ या काळात त्यांनी मुंबईच्या रुईया व एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात अध्यापन केले. १९४२साली त्यांनी बंगलोरच्या (बंगळुरु) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये वैमानिकी अभियांत्रिकी विभाग सुरू केला. सुविधांच्या अभावामुळे विमानरचनेसंबंधी संशोधनास अडथळा येतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘हवाई बोगद्या’ची (विंड टनल) निर्मिती केली. १९४७मध्ये ‘हिंदूस्थान एअरक्राफ्ट  लिमिटेड, बंगलोर या संस्थेत विमानरचनाशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी त्यांना आमंत्रण आले. हे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि १९४७ ते १९७१ या काळात त्यांनी विमानरचनाशास्त्र या विभागाचा पाया भक्कम केला.

प्रवास किंवा लढाऊ विमान याव्यतिरिक्त इतर कामे गतिमान आणि सुसह्य करण्यासाठी विमान वापरता येऊ शकते, ही कल्पना घाटगे यांना सुचली. पिकांवर औषधे व कीटकनाशके फवारण्यासाठी उपयुक्त असे कृषक विमान त्यांनी तयार केले. हे विमान चालवण्यास सोपे होतेच त्याशिवाय ते शेतकऱ्यांच्या खिशाला परवडण्याजोगेही असेल, याची काळजी घाटगे यांनी घेतली होती. भारतीय वायुसेनेसाठी प्राथमिक प्रशिक्षणास आवश्यक असे, ‘पुष्पक’ हे दोन माणसे नेणारे अत्यंत हलके विमानही त्यांनी तयार केले. १९४२मध्ये सैनिकांची ने-आण करणाऱ्या ग्लायडरचा आराखडा, विकास आणि निर्मिती त्यांनी केली. एचटी- टू या शिकाऊ विमानाचा आराखडा व सुधारणा, जेट इंजिनाने चालणारे शिक्षणास उपयुक्त असणारे ‘किरण’, अशी विविध विमाने तयार करण्याचे कार्य त्यांनी केले.

कृष्ण मेनन संरक्षणमंत्री असताना त्यांनी जर्मनीच्या डॉ. कुर्ट टॅक यांना भारतीय वायुसेनेसाठी लढाऊ जेट विमान बनविण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी, हा भारतीय विमानरचना शास्त्रज्ञांवर दाखविलेला अविश्वास आहे, असे डॉ. घाटगे यांचे मत होते. भारतीय वायुसेनेसाठी परदेशातून परवाना घेऊन भारतात विमानबांधणीची प्रक्रियासुद्धा त्यांना मान्य नव्हती. भारतातच संशोधनासाठी सुविधा निर्माण कराव्यात आणि भारतीयांकडूनच तंत्रज्ञानविषयक प्रगती करावी, असे त्यांचे मत होते.

इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस, एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, रॉयल एरॉनॉटिकल सोसायटी लंडन, इन्स्टिटय़ूट ऑफ एरॉनॉटिक्स अँड अ‍ॅस्ट्रॉनॉटिक्स अमेरिका अशा अनेक संस्थांचे विष्णू घाटगे सदस्य होते. १९६५साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. १९७२साली मराठी विज्ञान परिषदेच्या कोल्हापूरच्या अधिवेशनात विष्णू घाटगे यांचा गौरव करण्यात आला होता.

– अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta kutuhal indian aeronautical scientist vishnu madhav ghatge zws

ताज्या बातम्या