आज इअरफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. संगीत ऐकणं, फोनवर बोलणं, ऑनलाइन बैठका किंवा व्हिडीओ पाहणं यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण इअरफोन सुरक्षित आहेत का, हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर याचं उत्तर त्यांच्या वापरावर अवलंबून आहे. किती वेळ, किती मोठ्या आवाजात आणि कोणत्या परिस्थितीत इअरफोन वापरले जातात यावर ते सुरक्षित आहेत की नाहीत हे ठरतं.
इअरफोनचे अनेक फायदे आहेत. आजूबाजूच्या लोकांना त्रास न देता संगीत किंवा संभाषण ऐकता येतं. ऑनलाइन शिक्षण, कार्यालयीन बैठका आणि व्हिडीओ कॉलसाठी ते उपयुक्त ठरतात. प्रवासातही ते सोयीचे असतात. ‘नॉईज कॅन्सलेशन’ असलेल्या इअरफोनमुळे बाहेरील गोंगाट कमी होतो. त्यामुळे कमी आवाजातही स्पष्ट ऐकता येतं आणि कानांवरील ताणही कमी होतो.
परंतु इअरफोनचा अयोग्य वापर आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यानं श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. बराच वेळ इयरबड्स कानात राहिल्यास घाम आणि ओलावा साचून जिवाणू किंवा बुरशी वाढण्याची शक्यता असते. इयरबड्स स्वच्छ न ठेवल्याने किंवा एकाचे इअरबड्स इतरांनी वापरल्याने संसर्गाचा धोका वाढतो. तसेच रस्ता ओलांडताना किंवा वाहन चालवताना इअरफोन वापरल्यास हॉर्न, सायरन किंवा इतर इशार्यांचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
श्रवणतज्ज्ञ इअरफोन वापरणार्यांना एक सोपा नियम सांगतात. त्याला ६०/६० नियम म्हणतात. याचा अर्थ, इअरफोनचा आवाज शक्यतो कमाल क्षमतेच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नये आणि सलग ६० मिनिटांपेक्षा जास्त वापर करू नये. त्यानंतर किमान पाच ते दहा मिनिटे कानांना विश्रांती द्यावी. हा साधा नियम दीर्घकाळ श्रवणशक्ती सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. त्याचबरोबर नॉईज कॅन्सलेशन असलेले इअरफोन वापरणं फायद्याचं ठरतं. हे बाहेरील गोंगाट कमी करतात. त्यामुळे कमी आवाजातही संगीत किंवा संभाषण स्पष्ट ऐकू येतं आणि कानांवरील ताण कमी होतो.
दीर्घकाळ इअरफोन वापरायचे असल्यास ‘ओव्हर द इअर’ हेडफोन अधिक योग्य ठरतात. ते कानावर कमी दाब देतात, त्यामुळे अधिक आरामदायक असतात. तसेच त्यामध्ये कानाची स्वच्छताही तुलनेने चांगली राखली जाते. इन-इअर इअरफोन आकाराने लहान आणि सोयीचे असले, तरी दीर्घकाळ वापरासाठी ओव्हर-इअर हेडफोन हा अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो.
गिरीश घाटे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
इअरफोन वापरणं हानीकारक नाही. मात्र मोठ्या आवाजात आणि दीर्घकाळ वापरणं धोकादायक ठरू शकतं. आवाजाची मर्यादा, मर्यादित वापर, नियमित विश्रांती आणि स्वच्छता या सवयी पाळल्यास इअरफोन सुरक्षितपणे वापरता येतात.
