सिल्व्हर म्हणजे चांदी! चांदी हे मूलद्रव्य आहे. पण ‘जर्मन सिल्व्हर’ यामध्ये मात्र शून्य टक्के चांदी असते. म्हणजेच नावामध्ये ‘सिल्व्हर’ असं असलं तरी त्यात चांदी अजिबात नसते.
जर्मन सिल्व्हर, हे तांबं, शिसं आणि निकेल हे धातू एकत्र येऊन केलेलं मिश्रण आहे. हजार वर्षांपूर्वी जर्मनीमधल्या एका शहरात ‘अर्नऑगस्ट काईटनर’ या शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली, धातूंवर काम करणार्या कामगारांनी याचा शोध लावला आणि त्याला ‘पॅक्टॉन’ किंवा ‘व्हाइट कॉपर’ असं नाव दिलं. हे तयार करताना वर सांगितलेले धातू, योग्य प्रमाणात मिसळून, १२८० अंश सेल्सियसपर्यंत तापवून, मग ते साच्यात ओतून थंड केले गेले. तेव्हा या मिश्रणाचे भौतिक गुणधर्म चांदीसदृश आहेत असं आढळलं.
चांदीसारखा पांढरा चकचकीत रंग, तन्य म्हणजे तार करता येण्यासारखं आणि वर्धनीय म्हणजे पत्रा करता येण्यासारखं असं हे मिश्रण! पण हे मिश्रण, चांदीपेक्षा कठीण, दीर्घकाळ वापरण्याजोगं, गंज प्रतिरोधक, उष्णता आणि वीज प्रवाहित करण्याची क्षमता असणारं आणि विविध वस्तू बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त! या गुणधर्मामुळे युरोपीय व्यापारी या ‘पॅक्टॉन’कडे आकर्षित झाले आणि त्यांनी या मिश्रणाला ‘जर्मन सिल्व्हर’ असं नाव दिलं.
जर्मन सिल्व्हर शुद्ध चांदीच्या भावाच्या फक्त दहा टक्के इतक्याच किमतीला मिळतं. शिवाय ते गंजत नाही किंवा काळंही पडत नाही; फक्त कालांतराने त्या वस्तूंचा रंग पांढुरका फिका होत जातो. त्याचं चांदीसारखं दिसणं, हे त्यातल्या निकेल आणि तांबं यांच्या प्रमाणावर अवलंबून असतं. साच्यात घालून कोणताही आकार देणं शक्य असल्यामुळे, त्याचा वापर घरातल्या कटलरी, म्हणजेच कापण्यासाठी वापरल्या जाणार्या वस्तू, उदाहरणार्थ चाकू, सुरे, काटे इत्यादी गोष्टी बनवण्यासाठी करतात. शिवाय याची नक्षीची भांडी, पूजेचं साहित्य, देवांच्या मूर्ती वैगेरे गोष्टीही तयार करता येतात. जर्मन सिल्व्हर ‘तन्य’ असल्यामुळे ते विद्युत उपकरणांमध्ये, तसंच संगीत वाद्यामध्ये वापरता येतं.
परंतु शुद्ध चांदीचे दागिने आणि जर्मन सिल्व्हरचे दागिने यामध्ये फसगत होऊ शकते, कारण प्रथमदर्शनी दोन्ही चांदीचे वाटावे इतके त्यांच्यात साम्य असतं. शुद्ध चांदी ओळखता यावी म्हणून त्यावरती सरकारी नियमानुसार शुद्धतेचा मार्क म्हणजे हॉलमार्क असणं बंधनकारक असतं. जर्मन सिल्व्हरमध्ये चांदी अजिबात नसल्यामुळे, त्यावरती हॉलमार्क असण्याचा प्रश्न येत नाही. शुद्ध चांदी मऊ असल्यामुळे तिच्या घडवलेल्या वस्तू दबल्या जाऊ शकतात. पण जर्मन सिल्व्हर, चांदीच्या तुलनेत कडक असतं, त्यामुळे ते सहजासहजी दबलं जाऊ शकत नाही किंवा तुटत नाही.
– उर्मिला फडके
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
