५ एप्रिल १९१९ या दिवशी भारताच्या सागरी व्यापार क्षेत्रात एक मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली. एस. एस. लॉयल्टी हे भारतीय मालकीचे जहाज मुंबईहून लंडनकडे रवाना झाले. हा ऐतिहासिक दिवस गेली ६० वर्षे नियमितपणे साजरा केला जातो. त्याकाळी जहाजांवरचे अधिकारी ब्रिटिश असत आणि फक्त खलाशांचे काम भारतीयांना मिळत असे. भारतीय तरुणांनासुद्धा ही अधिकारपदे मिळावीत या हेतूने सर शिवस्वामी अय्यर यांनी हे प्रशिक्षण भारतीयांना उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला.
१९२७ साली कॅप्टन सुपिरटेंडन्ट सर हेन्री डिग्बी बेस्ट यांच्या नेतृत्वाखाली ट्रेनिंग शिप ‘डफरीन’ या जहाजाची या कामी नेमणूक झाली. सुरुवातीला या जहाजावर केवळ ५० नौवहन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाई. १९३५पासून २५ नौवहन अधिकारी आणि २५ मरीन इंजिनीअरना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. या प्रशिक्षण नौकेने देशाला काही नौदल प्रमुख आणि इतर अनेक उच्च पदस्थ अधिकारी दिले.




१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर, मुंबई आणि कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे ‘डायरेक्टरेट ऑफ मरीन इंजिनीयिरग ट्रेनिंग’ ही संस्था उभारून मरीन इंजिनीयरिंगचे प्रशिक्षण किनाऱ्यावर देण्यास सुरुवात झाली. त्या काळी मुंबईत २० आणि कलकत्त्यात ३० प्रशिक्षणार्थी घेण्यात येत असत. १९५४ साली हीच संस्था कलकत्त्यात एका नव्या जागेत स्थलांतरित झाली आणि प्रशिक्षणार्थीची संख्याही १०० वर नेण्यात आली. कालांतराने प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून चार वर्षांचा करण्यात आला. १९९४ साली या संस्थेला संशोधन संस्थेचा दर्जा देण्यात आला. नंतर ही संस्था २००८ साली स्थापन झालेल्या भारतीय सागरी विद्यापीठाच्या आधिपत्याखाली आली.
आजमितीस या संस्थेत २४६ (कोलकाता) आणि ८० (मुंबई) असे ३२६ विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना ‘बी.टेक.मरीन’ ही पदवी मिळते. शास्त्रशाखेच्या १० अधिक २ अभ्यासक्रमात गणित, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा-परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. या संस्थेने जगभरातील अनेक जहाज कंपन्यांना हजारो मरीन इंजिनीयर देऊन जागतिक पातळीवर कीर्ती मिळवली आहे. मुंबईत ही संस्था शिवडी पूर्व येथे आहे.
– कॅप्टन सुनील सुळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org