भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय पूर्वी महासागर विकास विभाग या नावाने ओळखले जात असे. मार्च १९८२मध्ये तो एक स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात आला. हा विभाग महासागरविषयक विकास उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी व अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी समन्वयाचे काम करत होता. भारत सरकारने फेब्रुवारी २००६मध्ये या विभागाला महासागर विकास मंत्रालय म्हणून अधिसूचित केले; तर जुलै २००६मध्ये या मंत्रालयाची फेररचना करून त्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयात रूपांतर केले. यामुळे भारतीय हवामान विभाग, दिल्ली व राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान पूर्वानुमान केंद्र, नोएडा हे विभाग या मंत्रालयाच्या अखत्यारीत आले.
भारत सरकारने अंतराळ आयोग आणि अणुऊर्जा आयोग यांच्या धर्तीवर पृथ्वी आयोगाची स्थापना करण्यास मान्यता दिली. राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था, चेन्नई; राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र, गोवा; उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे; भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती केंद्र, हैद्राबाद; राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अभ्यास केंद्र, केरळ या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या स्वायत्त संस्था आहेत. हवामान, महासागर व किनारी राज्य, जलविज्ञान, भूकंपविज्ञान आणि नैसर्गिक आपत्ती या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आणि शाश्वत पद्धतीने सागरी सजीव व निर्जीव संसाधनांचा शोध घेऊन त्यांचा वापर करणे या उद्दिष्टांसाठी हे मंत्रालय काम करते. अंटार्क्टिका, हिमालय आणि आर्क्टिक व दक्षिण महासागर येथे संशोधन केंद्रे उभारली असून, संशोधन मोहिमा हाती घेतल्या जातात.
हे मंत्रालय अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान या प्रमुख देशांसहित इतर अनेक देशांशी सहयोग करत आहे. समाजाच्या आर्थिक फायद्यासाठी पृथ्वी प्रणाली विज्ञान क्षेत्रात अद्यायावत ज्ञान व तंत्रज्ञानाद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणे मंत्रालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पृथ्वी प्रणालीतील बदलांच्या नोंदी करण्यासाठी वातावरण, महासागर व पृथ्वीचे दीर्घकालीन निरीक्षण करणे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून वातावरण व महासागरी घटनांचा अंदाज वर्तवणारी क्षमता विकसित करणे, हवामानविषयक आणि भूवैज्ञानिक आपत्तींचा अंदाज वर्तवणारी प्रणाली तयार करणे, पृथ्वीच्या ध्रुवीय आणि सागरी प्रदेशांतील संसाधनांचा शोध घेणे, पृथ्वी प्रणाली विज्ञानातील ज्ञानाचे सामाजिक, पर्यावरणीय व आर्थिक लाभांसाठीच्या सेवांमध्ये रूपांतर करणे ही मंत्रालयाची मुख्य ध्येयधोरणे आहेत.
डॉ. योगिता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org